
उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यात बद्रीनाथपासून सुमारे ३ किमीवर माणा गावाजवळ शुक्रवारी सकाळी ६.५५ वाजता हिमस्खलन झाले. त्यामुळे बाॅर्डर रोड ऑर्गनायझेशनचे (बीआरओ) ५५ मजूर बर्फात अडकले. घटनेच्या वेळी ते कंटेनरमध्ये झोपलेले होते. सायंकाळी उशिरापर्यंत सुरू असलेल्या बचाव मोहिमेनंतर ३३ मजुरांना बाहेर काढण्यात यश मिळाले. परंतु उशिरा पुन्हा बर्फवृष्टीमुळे बचाव पथकाला मोहीम राबवणे कठीण झाले. काळोख झाल्याने शोधमोहीम जवळपास थांबवावी लागली. बहुतांश मजूर उत्तर प्रदेश, पंजाब, जम्मू-काश्मीरमधील असल्याचे सांगण्यात आले.
हिमस्खलनाच्या घटनेची माहिती मिळताच माणा येथील लष्करी तळावरील क्विक रिस्पॉन्स टीमचे १०० हून जास्त जवान बचावकार्यात सहभागी झाले. त्यात डॉक्टर, रुग्णवाहिकेतील कर्मचारी व बचाव दलाचे सदस्य आहेत. सकाळी साडेअकरा वाजता बचाव दलाने पाच कंटेनरचा शोध घेऊन १७ मजुरांना सुरक्षित बाहेर काढले. त्यापैकी ४ जणांची प्रकृती गंभीर आहे. त्यावर लष्करी डॉक्टरांची निगराणी आहे. २२ मजुरांचा शोध सुरू आहे. लष्कराव्यतिरिक्त एनडीआरएफ, एसडीआरएफ, आयटीबीपीच्या पथकांना घटनास्थळी रवाना करण्यात आले आहे. परंतु दोन दिवसांपासून सुरू असलेल्या बर्फवृष्टीमुळे जोशीमठापासून पुढील मार्ग बंद आहे. त्यामुळे बचाव पथकांना पुढे जाणे कठीण झाले आहे. चमोलीचे जिल्हाधिकारी संदीप तिवारी म्हणाले, संततधार पाऊस व बर्फवृष्टीमुळे हेलिकॉप्टर पाठवण्यात अडचण आहे. बचाव टीम पायी मार्गक्रमण करत आहे. एसडीआरएफ आयजी रिधिमा अग्रवाल म्हणाल्या, एक टीम जोशीमठापासून रवाना झाली. लामबगड मार्ग ठप्प आहे.

सकाळचे सहा वाजलेले हाेते. बाहेर बर्फ काेसळत हाेता. छावणीत आम्ही सगळे मजूर आपापल्या कंटेनरमध्ये हाेताे. अचानक वेगळ्या प्रकारचा गडगडाट ऐकू आला. जणू एखादी विशाल गाेष्टी काेसळत हाेती. आधी पाण्याचा प्रवाह वाटला. परंतु काही क्षणांतच आवाज वाढला आणि हृदयाचे ठाेके वाढले. कुणीही बाहेर जाण्याची िहंमत करत नव्हता. आवाज वाढत हाेता. हादरे आणि भयंकर आवाज. मग लाेक ते पाहण्यासाठी बाहेर पडले. लगेच पळा-पळा असे ओरडू लागले. मी दार उघडले आणि पाहिले ताे डाेंगराच्या उंचावरून बर्फाचे विशाल थर आमच्या दिशेने वाहत येत हाेते. सर्वत्र गाेंधळ उडाळा. मजूर जमेल तिकडे पळाले. परंतु ताेपर्यंत बर्फाचा प्रवाह आमच्यावर काेसळला हाेता. मला वाटले मी हवेत उसळी घेतली. नंतरचे काही आठवत नाही. पुढे जवानांनी बर्फातून काढले.
चमोलीमध्ये माणा खिंड आहे. हे ठिकाण माणा गावापासून ५० किमीवर पुढे आहे. माणा ते तिबेटपर्यंत थेट रस्ता आहे. हा मार्ग सामरिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाचा आहे. या खिंडीजवळ तिबेटमधील थोलिंग हे गाव आहे. अनेक शतकांपासून उत्तराखंड व तिबेटमधील ही एक मोठी बाजारपेठ म्हणून ओळखली जाते. दोन वर्षांपासून माणा गावातून माणा खिंडीपर्यंत महामार्ग रुंदीकरणाचे काम चालू आहे. त्यासाठी देशभरातून बीआरओचे मजूर येऊन काम करतात. ते दिवसभर महामार्ग रुंदीकरणाच्या कामानंतर रात्री माणातील प्रवेशद्वाराजवळील कंटेनरमध्ये विश्रांतीसाठी निघून जातात.

