पुणे:
भारती विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे येथे आज वार्षिक राष्ट्रीय स्तरावरील टेक्नो-कल्चरल फेस्ट ‘भारतीयम २०२५’ चे उद्घाटन करण्यात आले. प्रमुख अतिथी ऋषिकेश धांडे (रीजन हेड – अकॅडमिक अलायंसेस, टीसीएस पुणे), सचिन भावसार (इंडस्ट्री को-पायलट्स फॉर मॅन्युफॅक्चरिंग लीड, टीसीएस पुणे) आणि डॉ. विवेक सावजी (कुलगुरू, भारती विद्यापीठ) यांच्या हस्ते उद्घाटन पार पडले. या प्रसंगी डॉ. राजेश प्रसाद (प्राचार्य), डॉ. सचिन चव्हाण (उप-प्राचार्य), डॉ. सुनिता जाधव (उप-प्राचार्य), डॉ. प्रमोद जाधव, डॉ. कुलदीप पाटील (भारतीयम २०२५, संयोजक) तसेच डॉ. सुधीर कदम, डॉ. आय. ए. शेख आणि प्रा. गजानन भोळे (समन्वयक, भारतीयम २०२५) उपस्थित होते.
भारतीयममध्ये विविध अभियांत्रिकी शाखांमधील १८ तांत्रिक स्पर्धा आणि १२ सांस्कृतिक स्पर्धांचा समावेश आहे. या सर्व स्पर्धांसाठी १२०० हून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विद्यापीठाच्या वार्षिकनियतकालिक ‘जिनर ‘चे प्रकाशनही करण्यात आले. यावेळी विद्यापीठाचे सुवर्णपदक विजेते आणि क्रीडा क्षेत्रातील सुवर्णपदक विजेत्यांचा सन्मान करण्यात आला. स्वागतपर भाषण डॉ. सचिन चव्हाण यांनी केले आणि भारतीयमच्या दोन दिवसांच्या कार्यक्रमाचे संक्षिप्त विवरण दिले. तर डॉ. प्रमोद जाधव (संयोजक, भारतीयम २०२५) यांनी आभारप्रदर्शन केले.
प्रमुख अतिथी ऋषिकेश धांडे म्हणाले, “टेकफेस्ट केवळ नाविन्यपूर्ण कल्पनांचे प्रदर्शन नसून, सहकार्याची भावना निर्माण करण्याचे व्यासपीठ आहे, जिथे प्रत्येकाने संवाद साधणे, सादरीकरण करणे आणि एकसंघपणे कार्य करणे शिकले पाहिजे. शिक्षण हे केवळ वैयक्तिक बुद्धिमत्तेपुरते मर्यादित नसून, अशा कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतल्याने आपल्या दृष्टीकोनाची मांडणी, इतरांसोबत सहकार्य आणि संपूर्ण संघाच्या यशासाठी योगदान देण्याची कला विकसित होते.”
सचिन भावसार यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना सांगितले, “नेहमी उत्सुक राहा, प्रयत्नशील राहा आणि प्रश्न विचारण्यास कधीही घाबरू नका.कारण सर्वात मोठी शोधयात्रा ज्ञानाच्या शोधातूनच सुरू होते. टेकफेस्टमध्ये किमान सहभाग तरी घ्या, कारण त्यातून तुमच्या समस्या सोडवण्याच्या आणि संवाद कौशल्यांना धार येते, जे तांत्रिक मुलाखतींमध्ये आत्मविश्वासाने स्वतःच्या कल्पना मांडण्यासाठी मदत करते. या कार्यक्रमांचे सहकार्यपूर्ण वातावरण टीमवर्क आणि नेतृत्व कौशल्य विकसित करण्यास मदत करते, जे व्यावसायिक जगतात अत्यंत महत्त्वाचे ठरते.”
कुलगुरू डॉ. विवेक सावजी यांनी विद्यार्थ्यांना संदेश देताना सांगितले, “हा उपक्रम आपल्याला हे जाणवून देते की आपण केवळ व्यक्ती नाही, तर भविष्य घडवणाऱ्या उत्साही विचारवंतांचा एक समुदाय आहोत. पुढील काळात, केवळ स्वतःच्या विकासावर लक्ष केंद्रित न करता, इतरांनाही पुढे नेण्याचा प्रयत्न करा, संधी निर्माण करा आणि एकत्र येऊन दीर्घकालीन प्रभाव निर्माण करा. प्रत्येक आव्हानात एक संधी दडलेली असते, आणि त्या क्षणांचे आपण असामान्य काहीतरी घडवण्यासाठी कसे रूपांतर करतो, हे आपल्या हातात आहे. शिक्षण हे केवळ वर्गातील ज्ञानापुरते मर्यादित नसून, त्या ज्ञानाचा उपयोग समाजाच्या उन्नतीसाठी कसा करता येईल, याकडेही लक्ष दिले पाहिजे.”
डॉ. राजेश प्रसाद (प्राचार्य, भारती विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालय) यांनी संस्थेच्या उल्लेखनीय रँकिंग, पुरस्कार आणि यशांविषयी माहिती दिली. ते म्हणाले, “या टेकफेस्टला यशस्वी करण्यासाठी तुम्ही दाखवलेल्या समर्पण, सर्जनशीलता आणि टीमवर्कबद्दल मला अभिमान वाटतो. प्रत्येक विद्यार्थी आणि प्राध्यापक सदस्यांचे मनःपूर्वक आभार! एकत्रित प्रयत्नांमधून आपण मोठे यश मिळवू शकतो, हे तुम्ही सिद्ध केले आहे.”

