गुनाट गावातील गणेश गव्हाणे यांनी सांगितले की, तीन दिवस आरोपी गाडे याचा शोध पोलिस आणि गुनाट ग्रामस्थ घेत होते. गुरुवारी रात्री १० वाजता आरोपीची चाहूल लागली होती. आम्ही आरोपी ताब्यात घेतला तेव्हा पोलिस अधिकाऱ्यांना कॉल केला अन् पोलिस यंत्रणा तत्काळ आली. गुनाट गावातील क्रिकेट सामने भरवले जातात, तेथील चंदनवस्ती आहे, तिथं आरोपी फिरत होता. आरोपीला मी स्वतः पाहिलं अन् तो पळत असताना मी त्याला पकडलं. त्यानंतर मी माझ्या संपर्कात असलेल्या पोलिस पाटलांना कळवलं, असे गव्हाणे यांनी सांगितले.
पुणे-स्वारगेट एसटी स्थानकात मंगळवारी पहाटे २६ वर्षीय तरुणीवर बलात्कार करून फरार झालेला आरोपी दत्तात्रय गाडे यास गुरुवारी मध्यरात्री अटक करण्यात पोलिसांना यश आले. शिरूर तालुक्यातील मूळ गुनाट गावात तो लपलेला होता. दाेन दिवस अन्नपाण्यावाचून उसाच्या शेतात व डाेंगर, नदीपात्रात फिरत राहिल्याने ताे प्रचंड दमला हाेता. गुरुवारी रात्री एका शेतातील घरात पाणी पिण्यास आल्यावर त्याने शरण जाण्याची तयारी असल्याचे सांगितले हाेते. मात्र, त्यानंतर ताे ज्या दिशेने पळून गेला तिथे पाठलाग करत पोलिसांनी नदीपात्रातील चारीतून त्याला गुरुवारी मध्यरात्री दीड ते दाेन वाजेच्या सुमारास अटक केली. दरम्यान, शुक्रवारी सायंकाळी त्याला पुणे न्यायालयात हजर केले असता १५ दिवसांची कोठडी सुनावण्यात आली.गुनाट गावाच्या परिसरात उसाची माेठी शेती असल्याने बिबट्याचा वावरदेखील आहे. पाेलिसांना दाट उसाच्या क्षेत्रात फिरण्यास काही निर्बंध हाेते. श्वानाची मदत घेऊनही त्यांना आराेपीचा माग काढता आला नव्हता. त्यामुळे दाेन ड्राेनच्या साहाय्याने तपासणी करण्यात येत हाेती. अंधाराचा फायदा घेत दत्ता गाडे हा नदीपात्रातील चारीतून बाहेर येत बहिरट नावाच्या एका कुटुंबाचे घरी पाणी पिण्यासाठी गेला. त्या वेळी त्यांनी तुला पाेलिस शाेधत आहेत, तू पाेलिसांकडे हजर हाे, असे सांगितले. यावर आराेपीने मी उद्या हजर हाेणार असल्याचे सांगत ताे पुन्हा शेताच्या बाजूने पळून गेला हाेता. हे पोलिसांना समजले. त्यांनी ग्रामस्थांच्या मदतीने आराेपीचा पाठलाग सुरू केला. गुन्हे शाखेचे पथक दुसऱ्या बाजूला शाेध घेत होते. मात्र आरोपी स्वारगेट पोलिसांच्या हाती लागला. आराेपीने गुन्ह्याची कबुली दिली.

