पुणे, २८ फेब्रुवारी – राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त सेवा आरोग्य फाऊंडेशनच्या समृद्धी वर्ग प्रकल्पाने विज्ञान प्रयोगांचे भव्य प्रदर्शन आयोजित केले होते. या उपक्रमाच्या माध्यमातून वस्त्यांमधील विद्यार्थ्यांना विज्ञानाबद्दलची गोडी लागावी आणि त्यांच्यातील सर्जनशीलता वाढावी,हा या विज्ञान प्रयोगांचा प्रदर्शन आयोजित करण्याचा मुख्य उद्देश होता.
या प्रदर्शनाचे वैशिष्ट्य म्हणजे सर परशुरामभाऊ महाविद्यालयाच्या समाजशास्त्र विभागाच्या १४ विद्यार्थ्यांच्या चमूने,सानिका कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली, सेवा आरोग्य फाऊंडेशनच्या समृद्धी वर्गातील विद्यार्थ्यांना व विद्यार्थिनींना मार्गदर्शन करून विविध प्रयोग तयार करण्यात मदत केली.
प्रमुख पाहुणे म्हणून पुण्याच्या सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठातील भौतिकशास्त्राचे प्राध्यापक विवेक मांडके उपस्थित होते.त्यांनी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या प्रयोगांचे कौतुक केले तसेच सेवा आरोग्य फाऊंडेशनच्या या उपक्रमाचे अभिनंदन केले.
मुलांना मार्गदर्शन करताना प्रा. विवेक मांडके म्हणाले, “भौतिकशास्त्राविषयी भीती बाळगण्याची गरज नाही.ज्यांना या विषयात आवड आहे त्यांनी आत्मविश्वासाने त्याचा अभ्यास करून संशोधनाच्या दिशेने वाटचाल करावी.विज्ञान क्षेत्रात योगदान देऊन देशाच्या प्रगतीत हातभार लावावा.”
कर्वेनगर येथील सरस्वती शिशु विद्यामंदिर येथे झालेल्या विज्ञान प्रदर्शनामध्ये समृद्धी वर्गातील १४ वस्त्यांमधील १०० विद्यार्थ्यांनी व विद्यार्थिनींनी भाग घेतला.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी समृद्धी वर्ग प्रकल्प समन्वयक निरंजनी शिरसट आणि प्रकल्पातील शिक्षिकांनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमाला सेवा आरोग्य फाऊंडेशनच्या संचालक डॉ. हर्षदा पाध्ये आणि डॉ सतीश जोशी उपस्थित होते.तसेच, कर्वेनगर परिसरातील अनेक नागरिकांनी आपल्या मुलांसह या प्रदर्शनाला भेट दिली आणि विद्यार्थ्यांच्या विज्ञान प्रयोगांचे कौतुक केले.
विज्ञानाच्या प्रोत्साहनासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल
सेवा आरोग्य फाऊंडेशनच्या या उपक्रमामुळे विज्ञानाच्या गोडीचा प्रसार होत असून,पुढील वर्षीही अधिक मोठ्या प्रमाणावर हे विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्याचा मानस आहे.वस्त्यांमधील विद्यार्थ्यांना अशा संधी उपलब्ध करून देणाऱ्या सेवा आरोग्य फाऊंडेशनचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.
राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त सेवा आरोग्य फाऊंडेशनतर्फे विज्ञान प्रयोगांचे प्रदर्शन
Date:

