: श्री वृद्धेश्वर सिद्धेश्वर देवस्थान ट्रस्टतर्फे श्री वृद्धेश्वर सिद्धेश्वर जीवनगौरव पुरस्कार सोहळा
पुणे: आजच्या काळामध्ये आपण टीव्ही सुरू केल्यानंतर अनेक नकारात्मक बातम्या पाहायला मिळतात, अशा गोंधळलेल्या आणि नकारात्मक वातावरणात आपल्या संस्कृतीचे संवर्धन करण्याचे महत्त्वाचे कार्य श्री वृद्धेश्वर सिद्धेश्वर देवस्थान ट्रस्ट करत आहे. त्यामुळेच या देवस्थानच्या विविध उपक्रमांच्या मी पाठीशी कायमच उभी असते. आधुनिकीकरणापेक्षा संस्कृती रक्षण करणे आज अधिक महत्त्वाचे आहे, अशी भावना ज्येष्ठ उद्योजिका आणि सामाजिक कार्यकर्ता शोभा धारिवाल यांनी व्यक्त केली.
शिवाजीनगर मधील श्री वृद्धेश्वर सिद्धेश्वर देवस्थान ट्रस्ट तर्फे आयोजित करण्यात आलेल्या महाशिवरात्र संगीत महोत्सवात वृद्धेश्वर सिद्धेश्वर जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आले, त्यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून शोभा धारिवाल बोलत होत्या. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील मुख्य चोपदार राजाभाऊ रंधवे, शिवाजीनगर चे आमदार सिद्धार्थ शिरोळे, ट्रस्टचे अध्यक्ष हनुमंत बहिरट पाटील, सचिव सुधीर दुर्गे, खजिनदार शशिकांत भोसले, विश्वस्त महेश दुर्गे, संजय सातपुते, आर्किटेक्ट शिरीष केंभवी यावेळी उपस्थित होते. स्थायी समितीचे माजी अध्यक्ष बाळासाहेब बोडके यांना सामाजिक क्षेत्रातील जीवनगौरव पुरस्कार तर परमपूज्य श्री योगीराज भाऊ महाराज परांडे यांना धार्मिक क्षेत्रातील जीवनगौरव पुरस्कार यावेळी प्रदान करण्यात आले.
शोभा धारिवाल म्हणाल्या, छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांसारख्या महान व्यक्तीने बलिदान देऊन आपली संस्कृती टिकवण्याचे काम केले. आज याच संस्कृतीचे संवर्धन करण्याची मोठी जबाबदारी आपल्यावर आहे. केवळ आधुनिकीकरण करून संस्कृतीकडे दुर्लक्ष करता येणार नाही. संस्कृती टिकली तर आपण टिकणार आहोत, हे आपण लक्षात घेतले पाहिजे त्यामुळेच वृद्धेश्वर सिद्धेश्वर देवस्थान विविध उपक्रमांच्या माध्यमातून संस्कृती रक्षणाचे करत आलेले काम अतिशय महत्त्वाचे आहे.
राजाभाऊ रंधवे चोपदार म्हणाले, पुण्यामध्ये शेकडो देवस्थान आहे. त्यांच्याकडे हजारो एकर जमिनी आहेत या जमिनी जर मराठवाडा आणि विदर्भातून पुण्यामध्ये शिकण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना अभ्यासिकेच्या माध्यमातून उपयोग करून दिला तर त्यांना निश्चितच याचा फायदा होईल. असाच एक उपक्रम वृद्धेश्वर सिद्धेश्वर देवस्थान हे अभ्यासिकेच्या माध्यमातून हाती घेणार आहे. त्यांच्या या अभ्यासिकेमुळे भविष्यामध्ये अनेक विद्यार्थ्यांना निश्चितच फायदा होणार आहे.
सिद्धार्थ शिरोळे म्हणाले, समाजामध्ये अनेक व्यक्ती आपापल्या परीने राष्ट्र निर्मितीचे काम करीत असतात हे काम करणाऱ्या व्यक्तींना प्रकाशात आणण्याचे महत्त्वाचे कार्य वृद्धेश्वर सिद्धेश्वर देवस्थान करत आहे, त्यांचे हे कार्य समाजासाठी निश्चितच महत्त्वाचे आहे.
हनुमंत बहिरट पाटील म्हणाले, महापालिकेपासून ते मेट्रो पर्यंत अनेक प्रशासकीय अडचणी देवस्थान समोर आल्या, परंतु विश्वस्त मंडळाने या सर्व अडचणींवर मात करून मंदिराच्या परिसराचा विकास करण्यावर भर दिला. त्याचेच आज फलित दिसत आहे. समाजातील अनेक व्यक्तींना एकत्र आणून देवस्थानचे विकास करण्याचे उद्दिष्ट भविष्यातही साध्य करण्यात येणार आहे.

