गोवा-पणजी – नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया (एनएसई) आणि गोवा सरकार यांनी ‘स्टुडंट स्किलिंग प्रोग्रॅम’ लाँच करण्यासाठी करार केला असून त्याअंतर्गत गोव्यातील तरुणांना बँकिंग, वित्तीय सेवा आणि विमा (बीएफएसआय) क्षेत्रासाठी सक्षम करण्याचे ध्येय आहे. त्यासाठी दोन्ही पक्षांमध्ये सामंजस्य करार (एमओयू) करण्यात आला असून त्यामुळे उद्योगक्षेत्रासाठी आवश्यक कौशल्ये तरुणांना शिकवण्याच्या दृष्टीने लक्षणीय पाऊल टाकण्यात आले आहे. तरुणांचा कौशल्य विकास करण्यासाठी एनएसईबरोबर करार करणारे गोवा हे उत्तराखंड, उत्तराखं, मेघालय, छत्तीसगढ आणि आसामनंतरचे पाचवे राज्य आहे.
या करारावर श्री. भूषण के सवाईकर, संचालक, डिरेक्टरेट ऑफ हायर एज्युकेशन, गोवा सरकार आणि श्री. श्रीराम कृष्णन, प्रमुख व्यवसाय विकास अधिकारी, एनएसई यांनी सह्या केल्या. यावेळी गोव्याचे माननीय मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत उपस्थित होते. हा करार गर्व्हन्मेंट कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स, सांखळी, गोवा येथे करण्यात आला.
गोव्याची आर्थिक यंत्रणा वेगाने विस्तारत असून तरुणांचा योग्य कौशल्यांसह विकास करून या क्षेत्राला लक्षणीय योगदान देण्यासाठी सज्ज आहे. एनएसईचा स्टुडंट स्किलिंग प्रोग्रॅम गोवा सरकारच्या मानवी भांडवल उभारण्याच्या उद्दिष्टाशी सुसंगत असून त्यामुळे आर्थिक स्वास्थ्या आणि सामाजिक चालना मिळण्यास मदत होणार आहे. एनएसई आणि गोवा राज्याने कौशल्य विकासाला प्राधान्य देण्याचे ठरवले असून कौशल्य विकास व राज्यातील तरुणांसाठी उपलब्ध असलेल्या रोजगार संधी यातील दरी सांधण्यासाठी बांधील आहे.
स्टुडंट स्किलिंग प्रोग्रॅम दोन टप्प्यांत घेतला जाणार आहे. पहिल्या टप्प्यात २० तासांच्या ट्रेनिंग प्रोग्रॅमचा समावेश असून तो पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना ‘फाउंडेशन कोर्स इन बीएफएसआय’चे प्रमाणपत्र दिले जाणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांना आवश्यक वित्तीय कौशल्ये आत्मसात करता येतील आणि त्याद्वारे वैयक्तिक तसेच व्यावसायिक विकास साधता येईल. दुसऱ्या टप्प्यात ३० तासांच्या अत्याधुनिक ट्रेनिंग प्रोग्रॅमचा समावेश असेल. हा प्रोग्रॅम विद्यार्थ्यांना एनएसआयएम रेग्युलेटरी परीक्षेसाठी तयार करण्याच्या दृष्टीने बनवण्यात आला आहे. यशस्वी उमेदवारांना उद्योगक्षेत्रासाठी प्रमाणित असलेले प्रमाणपत्र दिले जाणार असून त्यामुळे भांडवली बाजारपेठेत रोजगार मिळवण्याच्या त्यांच्या संधी वाढतील.
एनएसईचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. आशिषकुमार चौहान म्हणाले, ‘गोवा सरकारबरोबर करण्यात आलेली ही भागिदारी बीएफएसआय क्षेत्रातील कुशल मनुष्यबळाचा अभाव कमी करण्याची आमची बांधिलकी दर्शवणारा आहे. दर्जेदार आणि प्रमाणबद्ध प्रशिक्षण उपलब्ध करून आम्ही भविष्यासाठी सज्ज मनुष्यबळ तयार करण्याचे व आर्थिक क्षेत्राच्या बदलत्या गरजा पूर्ण करण्याचे ध्येय ठेवले आहे.’
गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले, ‘नॅशनल स्टॉक एक्सचेंज आणि गोवा सरकार यांच्यात करण्यात आलेला हा सामंजस्य करार गोव्यातील तरुणांना आवश्यक कौशल्ये आत्मसात करण्यासाठी सक्षम करण्याच्या आमच्या ध्येयाच्या प्रवासातील महत्त्वाचा टप्पा आहे. या स्टुडंट स्किलिंग प्रोग्रॅममुळे आमच्या गुणवत्तापूर्ण तरुणांना चांगले करियर करता येईल तसेच भांडवली बाजारपेठेची कुशल मनुष्यबळाची गरज पूर्ण होईल. एनएसईसारख्या संस्थेबरोबर करार करत आम्ही विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे आणि उद्योगक्षेत्रातील मापदंड व नव्या गरजांशी सुसंगत प्रशिक्षण मिळेल याची काळजी घेतली आहे. हा करार गोव्याचे नॉलेज हबमध्ये रुपांतर करत तरुणांना आजच्या जागतिक अर्थव्यवस्थेसाठी सक्षम करण्याच्या सरकारच्या उद्दिष्टाशी अनुकूल आहे. ’

