स्वारगेट बस स्टँडवरील बस मध्ये बलात्कार करणारा आरोपी पकडून दिल्याबद्दल आयुक्तांनी मनाले अनेकांचे आभार
पुणे-स्वारगेट एसटी स्थानक परिसरात 26 वर्षीय तरुणीवर शिवशाही बसमध्ये झालेल्या बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडे याला पुणे पोलिसांनी शिरूर परिसरात गुनाट गावच्या हद्दीतून शुक्रवारी रात्री अटक केली आहे. या कारवाईत सुमारे 500 पोलिस कर्मचारी मागील तीन दिवस काम करत होते . त्यासोबत गावातील 400 ग्रामस्थ यांचे सहकार्य मिळाले. श्वान पथकाने ऊस शेतातील जागा दाखवल्या होत्या तसेच ड्रोन मदत घेण्यात आली. आरोपीला न्यायालयात हजर करून पुढील तपास करण्यात येईल. या प्रकरणात विशेष सरकारी वकील यांची नियुक्ती करून फास्ट ट्रॅक न्यायालयात केस चालवण्यात येईल अशी माहिती पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
अमितेश कुमार म्हणाले की, शहरातही महिला सुरक्षा आढावा घेण्यात आला आहे. शहरातील विविध भागातील सेफ्टी ऑडिट घेतले जात आहे. मनपा सोबत एकदा पुन्हा डार्क स्पॉट जागी लाईट खांब लावून गस्त वाढविण्यात येईल. महिला सुरक्षा बाबत सुरक्षित वातावरण निर्माण करण्यात येईल. तपास उशिरा लागला असला तरी तक्रार आल्यावर याबाबत तपास तातडीने सुरू करण्यात आला. आरोपी बाबत सीसीटीव्ही तपासणी करून त्याची ओळख पटविण्यात आली. ग्रामस्थ यांनी मोठ्या प्रमाणात पोलिसांना सहकार्य केले आहे त्यामुळे स्वतः मी गावात जाऊन त्यांचा सन्मान करणार आहे. गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिस प्रयत्न करत आहे आणि या गुन्ह्यात आरोपीला कडक शिक्षा करण्याबाबत पोलिस प्रयत्नशील राहतील.अमितेश कुमार म्हणाले की, प्रकरणात आरोपी शोधण्यावरुन पोलिसांमध्ये कोणताही श्रेयवाद नाही असेही त्यांनी स्पष्ट केले. तर सर्व पोलिस तपास कार्यात सहभागी होते असे त्यांनी स्पष्ट केले. रात्र दिवस पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी एकत्र काम केले. आरोपीचे नाव तक्रार दाखल होताच निष्पन्न करण्यात आले होते. ग्रामस्थ आणि पोलिस एकत्रित काम करत होते. गावातील सार्वजनिक वाहने ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली. त्यामुळे आरोपीला गावा बाहेर पडणे शक्य झाले नाहीं. ज्या ग्रामस्थाने आरोपी बाबत माहिती दिली त्यांना एक लाखाचे बक्षीस देण्यात येईल. गावासाठी देखील काही देता येईल का याबाबत आम्ही विचार करू.
आरोपी दत्तात्रय गाडे याला गुरुवारी मध्यरात्री शिरुर तालुक्यातील गुनाट गावातून अटक केली आहे. त्याला लवकरच कोर्टात हजर करण्यात येणार आहे. तत्पूर्वी, करण्यात आलेल्या वैद्यकीय तपासणीत त्याने गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचे स्पष्ट झाले आहे.
पत्रकारांनी याविषयी येथे आयोजित पत्रकार परिषदेत पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांना प्रश्न केला. त्यावर ते म्हणाले, प्राथमिक वैद्यकीय चाचणीनुसार आरोपीच्या गळ्यावर दोरीचे व्रण आहेत. या व्रणानुसार आरोपीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. आरोपीने तशी कबुली दिली. मी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. दोरी तुटल्यामुळे व वेळीच इतर लोक धावून मदतीस आल्यामुळे आपला जीव वाचला असे त्याने सांगितले आहे. आता आरोपीने खरेच आत्महत्येचा प्रयत्न केला होता का? याची शहानिशा करण्यासाठी घटनास्थळी तपास पथक पाठवण्यात येणार आहे. पण प्राथमिक वैद्यकीय चाचणीनुसार त्याच्या गळ्यावर दोरीचे वळ होते.
अमितेश कुमार पुढे म्हणाले, स्वारगेट बसस्थानकातील 23 सीसीटीव्ही कॅमेरे व स्थानकाबाहेरील 48 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासल्यानंतर अवघ्या दीड-दोन तासांतच पोलिसांनी आरोपीची ओळख पटवली. मागील 2 दिवसांपासून आम्ही आरोपीच्या गावात शोधमोहिम राबवत होतो. काही पोलिस कर्मचारी तिथे तळ ठोकून होते. ते झोपलेही नाही. पण आरोपी तेव्हा सापडला नाही. अखेर आज त्याच्या मुसक्या आवळण्यात यश आले. याकामी मदत करणाऱ्या गावकऱ्यांचे मी अभिनंदन करतो. आम्ही गावाला भेट देऊन तेथील नागरिकांचा सत्कार करणार आहोत. विशेषतः गावासाठी काही करता येईल का? याचाही आमच्या पातळीवर विचार सुरू आहे.
पोलिसांनी या प्रकरणी एकदम शेवटी मिळालेल्या खबरीनुसार आरोपीला अटक केली. त्यात आरोपी कुठेतरी पाणी पिण्यासाठी आल्याचे सांगण्यात आले होते. आरोपी पाणी पिण्यासाठी आला असता तो एका व्यक्तीला दिसला. त्याने ती खबर पोलिसांनी दिली. त्यानंतर आरोपी तेथून पळून गेला. त्यानंतर ड्रोनच्या मदतीने दिसलेल्या त्याच्या दिशेतून त्याला अटक करण्यात आली. त्यामुळे ही खबर देणाऱ्या व्यक्तीला 1 लाखाचे बक्षीस दिले जाईल.

