पुणे- राजकीय हस्तक्षेपांमुळे २७ वर्षे कात्रज कोंढवा रस्त्यावरील मुख्य चौकातील ४० गुंठे जमीन महापालिका संपादित करू शकली नव्हती ती प्रशासकीय काळात नुकतीच संपादित केल्यावर आता कात्रज -कोंढवा रस्त्यावर ८ वर्षे रखडलेली ई-लर्निंग शाळा प्रशासकीय काळात सुरु होण्याच्या मार्गावर आहे. येत्या जून मध्ये हि शाळा सुरु करण्याकरिता प्रशासकीय पातळीवर प्रयत्न सुरु असल्याचे स्पष्ट होत आहे.
कात्रज-कोंढवा रस्त्यावरील सर्वे नंवर १९ पार्ट येथील अॅमेनिटी स्पेसवर ई-लर्निंग शाळेचे काम मागील आठ वर्षांपासून सुरु आहे. मात्र, आता प्रशासकीय काळात नागरिकांची प्रतिक्षा संपली असून ही शाळा जूनमध्ये सुरु होणार असल्याचे महापालिकेकडून संकेत देण्यात आले आहे. तशा पद्धतीने तयारीचे आदेश महापालिका आयुक्तांकडून विद्युत विभाग आणि शिक्षण विभागाला देण्यात आलेले आहेत.संबंधित शाळेच्या इमारतीला २०१५ मध्ये तळ मजल्याव्यतिरिक्त ५ मजले अशी परवानगी देण्यात आली होती. त्यानंतर २०१६मध्ये सदर कामाचे भूमीपूजन करण्यात आले आणि प्रत्यक्ष कामास सुरवात झाली. सद्यस्थितीत याठिकाणी लोअर ग्राउंड, लोअर पार्किंग, अप्पर ग्राउंड व पहिला मजला पूर्ण झाला आहे.दुस-या मजल्याचे काम सुरु आहे. २०१६ ते २०२४ पर्यंत टप्प्याटप्प्यांत निधी उपलव्ध झाल्याने हे काम रेंगाळले होते. आता एकुण १८ वर्गखोल्या व स्वच्छतागृहाचे कामे पुर्ण करण्यात येणार आहे.एप्रिल २०२५पूर्वी महापालिका आयुक्तांनी भवन रचना विभागाला काम पूर्ण करुन दोन मजल्यांसह शाळेची इमारत हस्तांतरित करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतर भवन रचना विभागाकडून कामाला गती देण्यात आली आहे. इमारतीचे दोन मजले वापरायोग्य पुर्ण करण्याच्या दृष्टीने काम सुरु आहे.एप्रिल २०२५ पुर्वी काम पूर्ण होईल या उद्देशाने दोन मजल्यांवर शिक्षण विभागाने शाळा सुरू करण्याची कार्यवाही करावी’ असेही आदेश शिक्षण विभागालाही दिले आहेत. त्याचबरोबर, या इमारतीची विद्युतविषयक कामे करण्यासाठी शाळा सुरू करण्याच्या दृष्टीने विद्युतविषयक कामांचे पुर्वगणनपत्रक व निविदा प्रक्रिया राबविण्याचेही सांगण्यात आले आहे. त्यामुळे येणाऱ्या शैक्षणिक वर्षात जूनमध्ये किमान दोन मजल्यांवर शाळा सुरु होणार हे निश्चित झाले आहे.