पुणे-पोलीसाच्या खुनाची शिक्षा भोगत असलेला कैदी पोलिसांच्या तावडीतून पळाल्यावर तब्बल ११ वर्षानंतर पुन्हा त्याला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे.
कर्नाटक पोलीस अंमलदार हे ड्युटी वरती असताना अमरीश काशीनाथ कोळी, रा. कर्नाटक याने त्यांचा खुन केला होता. सदर बाबत कर्नाटक, गुलबर्गा पोलीस स्टेशन गु.र.नं. ५७/२००९ भा.द.वि.कलम ३०२,३५३,३३२,५०४ अन्वये गुन्हा दाखल आहे. सदर दाखल गुन्हयात न्यायालयाने आरोपीस ३० वर्षाची शिक्षा सुनावलेली आहे.
सदर आरोपी अमरीश कोळी, हा शिक्षा भोगत असताना आजारी पडल्याचा बहाणा करुन उपचारा कामी विजापुर शासकीय रुग्णालय, विजापुर, कर्नाटक येथे उपचार घेत असताना दिनांक १४/०८/२०१४ रोजी पोलीसांच्या रखवालीतुन पळुन गेला होता. त्याबाबत कर्नाटक, विजापुर येथील गांधी चौक पोलीस स्टेशन गुन्हा रजि. नंबर २५९/२०१४ भा.द.वि.कलम २२४ अन्वये गुन्हा नोंद आहे.
फुरसुंगी पोलीस स्टेशन कडील पोलीस अमंलदार सुनिल कांबळे व वैभव भोसले यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहीती मिळाली की, इसम नामे अमरीश काशीनाथ कोळी, हा सद्या रा. गंगानगर, फुरसुंगी, पुणे याने १४ वर्षापुर्वी एका पोलीसाचा खुन केला असुन तो शिक्षा भोगत असताना ११ वर्षापुर्वी शासकीय रुग्णालयातुन पोलीसांच्या कस्टडी मधुन पळुन आला आहे. सद्या तो राहुल कांबळे व राजु काळे असे बनावट नाव धारण करुन ओळख लपवुन राहत आहे.
सदर आरोपी अमरीश कोळी, सद्या रा. गंगानगर, फुरसुंगी, पुणे याचे हालचालीवर नजर ठेवुन त्याचेबाबत माहीती घेतली असता तो कधी पुणे तर कधी सोलापुर येथे वेगवेगळ्या ठिकाणी राहत आहे. तसेच त्याने बनावट आधारकार्ड व पॅनकार्ड काढलेले असुन तीन लग्न केलेले आहेत. कर्नाटक येथील गुलबर्गा पोलीस स्टेशनची संपर्क करुन इसम नामे अमरीश काशीनाथ कोळी, याची माहीती व फोटो मागुन घेतला. सदरबाबत खात्री झाल्यानंतर गुलबर्गा ग्रामीण पोलीस स्टेशनशी संपर्क करुन कर्नाटक येथुन पो. अमंलदार भिमानायक व शशीकुमार हुगार हे दि.२६/०२/२०२५ रोजी पोलीस ठाणेस आल्यानंतर पोहवा. महेश उबाळे, पो. अंम सुनिल कांबळे व वैभव भोसले यांनी आरोपी नामे अमरीश काशीनाथ कोळी, वय ४५ वर्ष मुळ पत्ता-घाटगे लेआऊट, कलबुर्गी, कर्नाटक सद्या रा. गंगानगर, फुरसुंगी, पुणे यास शिताफीने पकडुन पुढील कार्यवाहीसाठी कर्नाटक पोलीसांच्या ताब्यात दिले आहे.
सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर, श्री. मनोज पाटील, मा. पोलीस उप आयुक्त, परी-५, पुणे शहर डॉ. राजकुमार शिंदे, मा. सहा पोलीस आयुक्त, हडपसर विभाग, पुणे शहर श्रीमती अनुराधा उदमले, त्यांचे मार्गर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक, फुरसुंगी पोलीस स्टेशन पुणे शहर, श्री. मंगल मोढवे, पोलीस निरीक्षक (गुन्हे), श्री. राजेश खांडे, पोलीस हवा. महेश उबाळे, पो. अंमलदार सुनिल कांबळे वैभव भोसले सर्व फुरसुंगी पोलीस स्टेशन पुणे शहर यांनी केली आहे.