विदुषी सानिया पाटणकर, पंडित सत्यशील देशपांडे, डॉ. पुष्कर लेले, अरुंधती पटवर्धन यांचा सहभाग
पुणे : अनाहत नादाची अनुभूती देणाऱ्या शतकातील महान गायक पंडित कुमार गंधर्व यांची गायकी सांगीतिक महोत्सवातून उलगडली. महोत्सवाला रसिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला.
महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आज (दि. 26) पंडित कुमार गंधर्व महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. बालशिक्षण मंदिराजवळील एमईएस सभागृहात या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. यात विदुषी सानिया पाटणकर यांचे बहारदार गायन झाले तर डॉ. पुष्कर लेले यांनी पंडित कुमार गंधर्व यांच्या निर्गुणी भजनाची वैशिष्ट्ये उलगडली. पंडित सत्यशील देशपांडे यांनी पंडित कुमार गंधर्वांच्या सांगीतिक विचारांवर भाष्य करत सादरीकरणही केले.
महोत्सवातील पहिले पुष्प जयपूर-अत्रौली घराण्याच्या सुप्रसिद्ध गायिका विदुषी सानिया पाटणकर यांनी गुंफले. त्यांनी आपल्या मैफलीची सुरुवात राग श्रीमधील मध्यलय झपतालातील ‘हरि के चरण कमल’ या बंदिशीने केली. अनवट रागातील ही बंदिश सहजतेने फुलवत नेत पाटणकर यांनी आपल्या गायकीवरील प्रभुत्व दर्शविले. गुरू अरविंद थत्ते यांनी याच रागात बांधलेली अनोखी सरगम सादर करून त्यांनी रसिकांची मने जिंकली. अंशुलप्रताप सिंग (तबला), माधव लिमये (संवादिनी) तर वेदवती परांजपे, आदिती नगरकर, रुची शिरसे यांनी स्वरसाथ केली.
दुसरे पुष्प गुंफताना डॉ. पुष्कर लेले यांनी कल्याण रागातील पंडित कुमार गंधर्व रचित शिवाचा जपस्वरूप असणारी ‘शिव शिव कल्याण करे’ ही बंदिश ताकदीने सादर केली. पंडित कुमार गंधर्व यांच्या निर्गुणी भजन गायकीचे अनोखे दर्शन घडविताना डॉ. लेले यांनी ‘माया महा ठगनी हम जानी’ हे संत कबिर यांचे भजन अतिशय भावपूर्ण स्वरात सादर केले. गौतम टेंबेकर (तबला), माधव लिमये (संवादिनी) आणि रोहन पोळ यांनी स्वरसाथ केली.
पंडित कुमार गंधर्व यांचे ज्येष्ठ शिष्य पंडित सत्यशील देशपांडे यांनी पंडित कुमार गंधर्व यांच्या सांगीतिक विचारांवर भाष्य करताना कुमारजींच्या नजरेतून विविध रागांचे चलन, रागरूप यांचे अनोखे दर्शन घडविले. कुमारजींना पारंपरिक संगीत अमान्य नव्हते तर कुमारजींचे वेगळेपण म्हणजे या संगीतात ते अजून काहीतरी नाविन्य शोधत परंपरेचे परिशीलन करीत असत, असे सांगून राग दरबारीची झलक तसेच केहन ऐकविली. पंडित बबनराव हळदणकर यांनी रचलेला ‘दिम दिम तन न दे रे ना’ हा तराणाही ऐकविला. जयपूर आणि ग्वाल्हेर घराण्याचे गायन वैशिष्ट्य दाखवून कुमारजींच्या मोरपंखी अलवार गायनाचे पदर उलगडले. प्रत्येक रागात अष्टांगाचे दर्शन घडविणे अपेक्षित नसते तर बंदिशीला पूरक अंग वापरणे महत्त्वाचे असते, ज्यातून गायन या हृदयीचे त्या हृदयीला भिडते असे सांगून नंद रागातील ‘ढुंढा बारी सैय्या’ या बंदिशीची झलक ऐकविली. कुमारजींचे गायनातील सखोल विचार ऐकून आणि पंडित सत्यशील देशपांडे यांच्या सादरीकरणातून नवकलाकारांना रागाकडे पाहण्याची अभ्यासक दृष्टी मिळाली.
कार्यक्रमाचे शेवटचे पुष्प ज्येष्ठ भरतनाट्यम नृत्यांगना अरुधंती पटवर्धन आणि त्यांच्या शिष्यांनी गुंफले. त्यांनी सादरीकरणाची सुरुवात गणेशवंदनेने केली. हिंदुस्तानी संगीतावर आधारित रचना सादर करताना कालिमातेची स्तुती, ‘शिव शिव महादेव’ हे शिवध्रुपद ताकदीने सादर केले. कार्यक्रमाची सांगता पंडित कुमार गंधर्व यांनी अजरामर केलेल्या ‘गुरुजी मै तो एक निरंजन’ या निर्गुणी भजनावर नृत्याविष्कार सादर करून कलाकारांनी रसिकांची मने जिंकली.
कार्यक्रमास लेखाअधिकारी नरेंद्र तावडे यांची विशेष उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात माधुरी सहस्रबुद्धे, उज्ज्वल केसकर, ॲड. मिताली साळवेकर, सिद्धार्थ काक, सानिया पाटणकर, नितीन महाबळेश्वकर, पंडित सत्यशील देशपांडे, पुष्कर लेले आणि अरुंधती पटर्वधन यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने झाली. मान्यवर व कलाकारांचे स्वागत सानिया पाटणकर, नितीन महाबळेश्वरकर, संजय पायगुडे, क्रांतीशिला ठोंबरे यांनी केले.

