पुणे, दि. 27 : सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागामार्फत डॉ. बाबासाहेब आंबेडकर २५० मुलांचे शासकीय वसतिगृह, युनिट क्र.३ विश्रांतवाडी येरवडा, पुणे हे वसतिगृह नुकतेच सुरू करण्यात आलेले आहे. गुणवत्तेनुसार १४० पात्र मागासवर्गीय विद्यार्थ्यांना या ठिकाणी प्रवेश देण्यात आलेला असून त्यांनी तात्काळ वसतिगृहात हजर व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
या वसतिगृहात विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी वर्तमान पत्रात जाहिरात देण्यात आलेली होती. सदर जाहिरातीच्या अनुषंगाने प्राप्त झालेले अर्ज व सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात ज्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना प्रवेश मिळालेला नव्हता अशा सर्व अर्जांची एकत्रित गुणवत्ता यादी तयार करण्यात आलेली असून गुणवत्तेनुसार वसतिगृह प्रवेश मंजूर केलेली विद्यार्थ्यांची यादी वसतिगृहाच्या गृहप्रमुखांच्या कार्यालयात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या वसतिगृहाची मंजूर विद्यार्थी संख्या २५० इतकी असून सद्यस्थितीत गुणवत्तेनुसार १४० पात्र मागासवर्गीय विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आलेला आहे. उर्वरीत ११० जागा कनिष्ठ महाविद्यालय व बिगर व्यावसायिक विभागाच्या वर्गवारीनुसार प्रवेश अर्ज प्राप्त न झाल्याने रिक्त आहेत.
वसतिगृहाच्या गृहप्रमुखांकडून प्रवेश मंजूर झालेल्या १४० विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश घेण्याबाबत भ्रमणध्वनीद्वारे कळविण्यात आले आहे, अशीही माहिती सहायक आयुक्त, समाज कल्याण विशाल लोंढे यांनी दिली आहे.

