मानाचा चौथा गणपती श्री तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महिला साहित्यिकांचा सन्मान
पुणे : महिला लेखकांनी केवळ महिला किंवा त्यांच्या समस्येविषयी लिहायला पाहिजे असे नाही. महिलांचे जग वेगळे आहे. महिलांनी निम्मे अवकाश व्यापले आहे परंतु या अवकाशाची कल्पना कोणालाही नाही. महिला लिहितात त्याला खूप आयाम असतात. महिलांना गृहीत धरले जात होते परंतु लेखनाच्या माध्यमातून त्यांचे अव्यक्त जग उलगडत आहे, असे मत खासदार मेधा कुलकर्णी यांनी व्यक्त केले.
मानाचा चौथा गणपती श्री तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने मंडळाच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आणि मराठी भाषा गौरव दिनानिमित्त साहित्य क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल महिला साहित्यिकांचा सन्मान करण्यात आला. टिळक रस्त्यावरील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ज्येष्ठ अनुवादिका उमा कुलकर्णी, शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षाचे स्वागताध्यक्ष कृष्णकुमार गोयल, मंडळाचे अध्यक्ष विकास पवार, कोषाध्यक्ष नितीन पंडित, विनायक कदम महिला विश्वस्त अभिनेत्री वाळके उपस्थित होत्या.
स्नेहा अवसरीकर, वसुंधरा काशीकर, विनया खडपेकर, चित्रलेखा पुरंदरे, डॉ.स्मिता डोळे, ऋता पंडित या महिला साहित्यिकांचा सन्मान यावेळी करण्यात आला.
प्रा. मेधा कुलकर्णी म्हणाल्या, मुलांना कोणत्याही भाषेच्या शाळेत टाका, परंतु घरी मराठीतच बोला. आपल्या भाषेवर आपण प्रेम करायला पाहिजे त्या सोबतच इतर भाषांमधील साहित्य देखील वाचायला पाहिजे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
उमा कुलकर्णी म्हणाल्या, ललित साहित्य हे खूप प्रभावी असून त्याची ताकद वेगळी आहे. कथा, कादंबऱ्या समाजावर मोठा प्रभाव टाकू शकतात. साहित्य टिकून ठेवायचे असेल तर वाचकांच्या मनापर्यंत पोहोचले पाहिजे. आजच्या काळातील लेखकांनी आपले सामर्थ्य वाढवायला पाहिजे कारण आत्ताची पिढी ही आधीच्या पिढी इतकी भाबडी नाही. त्यामुळे लेखकांच्या साहित्यात दम असला पाहिजे. वाचन संस्कृती वाढवण्याची जबाबदारी केवळ वाचकांची नाही तर ती लेखकांची देखील आहे.
त्या पुढे म्हणाल्या, भाषा हे जिवंत माध्यम आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला म्हणून केवळ आनंद नको, तर भाषा बोलायला हवी. भाषा बोलली नाही तर ती मरून जाते. सध्या काही भाषांवरती ही वेळ आली आहे तसे मराठीचे होऊ देऊ नका, असेही त्यांनी सांगितले. नितीन पंडित यांनी सूत्रसंचालन केले.

