स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजन
पुणे : स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी मरणासन्न यातना सोसून देशाच्या स्वातंत्र्यासाठी दिलेले महत्त्वपूर्ण योगदान त्यांच्याच धारदार शब्दात तरुण कलाकारांनी आपल्या अमोघ वाणीने, आणि तितक्याच जिवंत अभिनयाने बालगंधर्व रंगमंदिराच्या रंगमंचावर अभिवाचनाच्या माध्यमातून सादर केले. या अभिवाचनाच्या द्वारे एका प्रकारे स्वातंत्र्यवीर सावरकरांचे बलिदान आणि त्यांचा जीवनपट ‘माझी जन्मठेप’ मधून पुन्हा एकदा रसिकांना अनुभवला.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त ग्राहक पेठेतर्फे आणि स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक यांच्या सहयोगाने ‘माझी जन्मठेप’ अभिवाचनाचा रंगमंचीय नाट्य अविष्काराचे आयोजन करण्यात आले होते. ग्राहक पेठेचे कार्यकारी संचालक सूर्यकांत पाठक, विद्याधर नारगोळकर, संदीप खर्डेकर, श्रीकांत जोशी आदी यावेळी उपस्थित होते. या स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा सामाजिक समरसतेचा संदेश पुढे नेत, कार्यक्रमात हिंदू खाटीक समाजाचे नेते नरेंद्र सदाशिव घोणे यांचा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला.
या अभिवाचन नाट्यविष्काराची संकल्पना अनंत वसंत पणशीकर यांची होती. तरी दिग्दर्शन डॉ. अनिल बांदिवडेकर, संकलन अलका गोडबोले, नेपथ्य संदेश बेंद्रे, शब्दाचार मार्गदर्शन सुभाष सावरकर, संगीत मयुरेश माडगावकर यांनी केले. जान्हवी दरेकर, मुग्धा गाडगीळ बोपर्डीकर, गौरव निमकर, समर्थ कुलकर्णी, शंतनू अंबाडेकर, नवसाजी कुडव हे कथन कलाकार होते.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी अंदमान मधील काळ्यापाण्याच्या शिक्षेच्या काळामध्ये कशा प्रकारच्या शारीरिक आणि मानसिक यातना भोगल्या याचे जिवंत चित्रच जणू या अभिवाचनाच्या माध्यमातून रसिकांसमोर उलगडले. ज्याप्रमाणे घाण्याला जुंपलेल्या बैलाकडून तेल काढणीचे काम करून घेतले जात, तसेच कैदयांकडून करून घेतले जाई. त्यावेळी त्यांना होणारा शारीरिक त्रास असो वा अंदमानच्या कोठडीमध्ये झालेली स्वातंत्र्यवीर सावरकर यांची मानसिक अवस्था अभिवाचनातून कलाकारांनी पुन्हा एकदा रसिकांसमोर मांडली.
सूर्यकांत पाठक म्हणाले, स्वातंत्र्यवीर सावरकर हे विज्ञाननिष्ठ होते. त्यांचा सामाजिक दृष्टिकोन जितका हवा तितका लोकांपर्यंत पोहोचलेला नाही. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा सामाजिक दृष्टीकोन समाजाच्या तळापर्यंत पोहोचावा, यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाच्या माध्यमातून तरुण पिढीपर्यंत स्वातंत्र्यवीर सावरकर पोहोचतील याची आम्हाला निश्चितच खात्री आहे, असेही त्यांनी सांगितले. ग्राहक पेठ, भगिनी निवेदिता सहकारी बँक आणि पु.ना.गाडगीळ अँड सन्स यांनी या उपक्रमासाठी विशेष सहकार्य केले.

