संतप्त तृप्ती देसाई पोलिसांच्या कब्जात…
पुणे : स्वारगेट बस स्थानकात २६ वर्षीय तरुणीवर झालेल्या बलात्कार प्रकरणाचे तीव्र पडसाद उमटताना दिसत आहेत. गृहराज्यमंत्री आणि शिवसेना नेते योगेश कदम यांनी स्वारगेट बस स्थानकाला भेट देत आढावा घेतला. यावेळी भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी योगेश कदमांची गाडी अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी देसाईंनाच ताब्यात घेत पोलीस व्हॅनमध्ये नेले. त्यानंतर देसाई अधिकच आक्रमक झाल्या.
लोकशाहीत आवाज उठवू शकत नाही का? मला कशाला अटक करताय? आरोपीला तातडीने अटक करा,अशी मागणी तृप्ती देसाई यांनी केली. पोलीस व्हॅनमध्ये बसतानाही तृप्ती देसाईंसह भूमाता ब्रिगेडच्या महिला कार्यकर्त्या ‘आरोपीला अटक झालीच पाहिजे’ अशा घोषणा देत होत्या.भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तथा सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी स्वारगेट बलात्कार प्रकरणाचा आढावा घेण्यासाठी पुणे दौऱ्यावर आलेल्या गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्यावर तिखट टीका केली आहे. यावेळी त्यांनी त्यांचा ताफाही अडवण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी वेळीच त्यांना ताब्यात घेऊन कदम यांच्या ताफ्याला मार्ग मोकळा करून दिला. पोलिस बलात्कार करणारा आरोपी शरण येण्याची वाट पाहत आहेत का? तुम्ही येथे कोणत्या तोंडाने आलात? आरोपीला घेऊन या? अशा विविध प्रश्नांची सरबत्ती त्यांनी यावेळी गृह राज्यमंत्र्यांवर केली.
तृप्ती देसाई यावेळी बोलताना म्हणाल्या की, स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपीला अटक केली जात नाही. पण लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्यांना ताब्यात घेतले जाते. गृहराज्यमंत्री योगेश कदम घटना घडल्यानंतर 50 तासांनी येथे आलेत. आम्हाला त्यांना राज्यात काय चाललंय याचा जाब विचारायचा होता. भेटायचे होते. यासाठी आम्ही त्यांची गाडी रोखण्याचा प्रयत्न केला. दत्तात्रय गाडेसारखा साधा आरोपी सापडत नाही. ही कसली यंत्रणा आहे? त्याच्यावर एक लाख रुपयांचे बक्षीस जाही करण्यात आले आहे.
पोलिसांना लाखोंचा पगार मिळतो. फुकट मिळतो. पोलिस यंत्रणा निष्क्रिय झाली आहे. राजकीय दबावामुळे अशी अनेक प्रकरणे दाबण्यात आली. संतोष देशमुख हत्या प्रकरण घ्या. वाल्मीक कराड स्वतःहून शरण आला. आता या प्रकरणातही आरोपी गाडे सरेंडर होण्याची वाट पाहिली जात आहे का? रात्रभर महिला झोपल्या नाहीत. आज सगळ्या महिला आहेत. मुले-मुली आहेत. सर्वजण घाबरलेत. महिला एसटीमध्ये सुरक्षित प्रवास करतात. पण एसटीही आता सुरक्षित राहिली नाही.
मंत्री योगेश कदम यांना लोकांनी निवडून दिले आहे. त्यामुळे आम्हाला त्यांना जाब विचारण्याचा अधिकार आहे. आम्हाला पोलिस जबरदस्तीने ओढून आणतात. तसे आरोपीलाही ओढून आणा. अन्यथा आमच्या ताब्यात द्या. आम्ही आमचा निकाल लावू. मध्यवर्ती भागातून आरोपी पळून जातो की पळवून लावला जातो? वाल्मीक कराड सरेंडर होणार अशा बातम्या आल्या होत्या. गृह राज्यमंत्री योगेश कदम इथे कोणत्या तोंडाने आलेत. त्यांनी आरोपीला घेऊन यावे. हे पुणे पोलिसांचे अपयश आहे. इथे कोयता गँग आहे, गाड्या जळत आहेत. पोलिस यंत्रणा साफ अपयशी ठरली आहे.
पालकमंत्री अजित पवार आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची भाषा करतात. आम्हा सर्वांची हीच मागणी आहे. त्यांचे बारामतीचे बसस्थान कुठे आणि आमचे स्वारगेट बसस्थानक कुठे. गाड्या बंद पडल्यात. त्यात कंडोमची पाकिटे पडलेत. साड्या पडल्यात. मटक्याचे आकडे चालतात. आम्ही आतापर्यंत अनेकदा हा विषय मांडला. पण अशी वेळ आली की रस्त्यावर उतरावे लागते. महिलांबाबत असे घडत असेल तर आम्हाला रस्त्यावर उतरावेच लागेल, असेही तृप्ती देसाई यावेळी बोलताना म्हणाल्या.

