मुंबई-स्वारगेट बस डेपोत 26 वर्षीय तरुणीवर अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. पहाटे ( २५ फेब्रुवारी) साडेपाचच्या सुमारास ही घटना घडली असून आरोपी मात्र फरार झाला या भयंकर घटनेनंतर सर्वत्र खळबळ उडाली असून सर्वच स्तरातून संताप व्यक्त केला जात आहे.या घटनेवर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. तानाजी सावंतांच्या मुलाचं विमान शोधून काढणारे पोलीस आरोपीला जेरबंद करू शकत नाहीत? असा सवाल काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सत्ताधाऱ्यांना सवाल केला आहे.
या प्रकरणावरून विजय वडेट्टीवार यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत टीका केली. त्यांनी म्हटले आहे की, “स्वारगेट बस स्थानकातील धक्कादायक घटना म्हणजे पुणे पोलिसांचा, एसटी प्रशासनाच्या अकार्यक्षमतेचा कळस होय. स्वारगेट बस स्थानकात २६ वर्षीय तरुणीवर अत्याचाराची संतापजनक घटना घडली आहे. पहाटेच्या सुमारास बंद असलेल्या शिवशाही बसमध्ये नेऊन तिच्यावर बलात्कार करण्यात आला. याहून धक्कादायक बाब म्हणजे आरोपी अजून पोलिसांना सापडला नाही!”पुढे त्यांनी म्हटले आहे की, “महायुतीतील माजी मंत्री आणि आमदार तानाजी सावंत यांच्या मुलाचे विमान शोधून काढणारे पुणे पोलिस आज पहाटे घडलेल्या या घटनेतील आरोपी अजूनही जेरबंद करू शकत नाहीत, ही बाब अत्यंत लाजिरवाणी आहे.”
ते म्हणतात की, “राज्याचे गृहखाते महिला सुरक्षेच्या बाबतीत आणखी किती ढिसाळ कामगिरी करणार ? एसटी प्रशासन जबाबदारी घेणार का? इतक होत असताना स्वारगेट बस स्थानकात कर्मचारी काय करत होते? परिवहन मंत्री कुठे आहेत?” असा थेट सवाल वडेट्टीवार यांनी केला आहे.


