– वल्लरी प्रकाशनच्या वतीने सावळा सखा, उणीव जाणिवांची, मोगरी सुगंध या काव्यसंग्रहांचे प्रकाशन
पुणे : कमी शब्दात लिहिता येणे फार अवघड आहे आणि ते कवीला जमले पाहिजे. कमीत कमी शब्दात मोठा आशय मांडण्याची कला ही कवीची सगळ्यात मोठी ताकद असते. कमी शब्दात लिहीण्यासाठी शब्दांची समृध्दी असणे गरजे आहे. याकरीता नेहमी साहित्याचे वाचन केले पाहिजे म्हणजे एकावेळी आपल्याला अनेक गोष्टींचा आनंद घेता येतो. त्याबरोबर त्यातून शब्द संपत्ती समृद्धी होते, असे मत व्याख्यात्या डाॅ. धनश्री लेले यांनी व्यक्त केले.
वल्लरी प्रकाशनच्या वतीने कवी अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. ऋषिकेश रमेश सराफ यांच्या “सावळा सखा भाग एक व दोन”, “उणीव जाणिवांची”, “मोगरी सुगंध” या चार काव्यसंग्रहांचा प्रकाशन समारंभ नवी पेठेतील एस. एम. जोशी सभागृहात संपन्न झाला. यावेळी व्याख्याता डॉ. धनश्री लेले, ज्येष्ठ संपादक व पत्रकार विद्याधर ताठे, वल्लरी प्रकाशनचे संचालक व्यंकटेश कल्याणकर, साहित्यिका मानसी चिटणीस, कवी डॉ. ऋषिकेश सराफ उपस्थित होते.
विद्याधर ताठे म्हणाले, मराठी भाषा १३ व्या शतकापासूनच अभिजात भाषा आहे, तिला फक्त आज केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. मराठी साहित्याचा आढावा घेतला, तर असे दिसते की सर्वाधिक संत साहित्यावर अभ्यास केला गेला आहे. मराठी साहित्यातील ७० टक्के भाग हा संत साहित्याने व्यापला आहे. संत साहित्यावर सर्वाधिक पीएचडी केली गेली आहे, असेही त्यांनी सांगितले.
व्यंकटेश कल्याणकर म्हणाले, आजच्या धकाधकीच्या जीवनात आपण आपले छंद जोपासणे विसरून जातो. मात्र आपल्या दैनंदिन जीवनाला छंदांची जोड कशी द्यावी याचे उत्तम उदाहरण डाॅ. ऋषिकेश सराफ यांनी दिले आहे. याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून छंदांच्या माध्यमातून आपले दैनंदिन जीवन कसे समृद्ध करता येईल याचा विचार करा, असेही त्यांनी सांगितले.
कवी डाॅ. ऋषिकेश सराफ यांनी आपल्या कवितांचे सादरीकरण करीत त्याचे विश्लेषण केले.
गौरी जोशी यांनी सरस्वती वंदना सादर केली तर प्रज्ञा कल्याणकर यांच्या पसायदानाने समारंभाची सांगता झाली. विश्वजीत सराफ यांनी सूत्रसंचालन केले. तर राधिका सराफ यांनी आभार मानले.

