कुठे चाललीस ताई, सातारची बस तिकडे लागलीये
पुणे-पु्ण्यातील स्वारगेट बसस्थानकावर शिवशाही बसमध्ये घडलेल्या बलात्काराच्या घटनेमुळे अवघा महाराष्ट्र हादरला आहे. पोलिसांनी या प्रकरणातील आरोपीचा शोध घेण्यासाठी युद्धपातळीवर हालचाली सुरू केल्या आहेत. आरोपीची ओळख पटल्यामुळे त्याच्या कोणत्याही क्षणी मुसक्या आवळल्या जातील असा अंदाज आहे. त्यातच आरोपीने पीडित तरुणीशी ताई म्हणत अत्याचार केल्यामुळे मोठा संताप व्यक्त केला जात आहे.
आरोपीने प्रथम पीडित तरुणीचा विश्वास संपादन केला. त्यानंतर शिवशाही बसमध्ये नेऊन तिच्यावर बलात्कार केला. पोलिसांच्या माहितीनुसार, पीडित तरुणी पुण्यात नोकरीला आहे. ती स्वारगेट बसस्थानकाहून फलटण या आपल्या गावी जात होती. पहाटे 5.30 च्या सुमारास ती स्वारगेट बसस्थानकावर बसची वाट पाहत थांबली होती. त्यावेळी आरोपी तिच्याजवळ गेला. काही वेळ तिच्याभोवती घुटमळळ्यानंतर तो तिच्या बाजूला जाऊन बसला. हा सर्व घटनाक्रम सीसीटीव्हीमध्ये दिसून येत आहे.
पीडितेभोवती काहीवेळ फिरल्यानंतर आरोपी तिच्या शेजारी जाऊन बसला. या दोघांचे बोलणे सुरू असताना तिथे शेजारी बसलेला एक व्यक्ती तेथून उठून जातो. त्यानंतर आरोपीने गोड बोलून पीडितेची ओळख करून घेतली. तिचा विश्वास संपादन केला.
पोलिसांनी सांगितले की, आरोपी पीडित तरुणीला म्हणाला ताई कुठे चाललीस? त्यावर मुलीने आपल्याला फलटणला जायचे असल्याचे सांगितले. त्यानंतर आरोपी म्हणाला, सातारची बस इथे लागत नाही, ती तिकडे लागलेली आहे. त्यावर तरुणी म्हणाली, नाही. बस इथेच लागते. म्हणूनच मी इथे बसली आहे. त्यावर आरोपी पुढे म्हणाला, बस तिकडे लागली आहे. चल मी तुला तिकडे घेऊन जातो. त्यानंतर मुलगी त्याच्याबरोबर जाते. तिथे गेल्यानंतर बसमध्ये अंधार होता.
हा अंधार पाहून तरुणीने आरोपीला विचारले की, बसमध्ये अंधार आहे. त्यावर आरोपी म्हणाला, ही रात्री उशिराची बस आहे. लोक झोपलेले आहेत. त्यामुळे लाईट बंद आहे. तू वरती चढून मोबाईलची टॉर्च लावून चेक करू शकते. त्यानंतर पीडित तरुणीने बसमध्ये चढून टॉर्च लावण्याचा प्रयत्न केला. तोपर्यंत आरोपीने बसचा पाठीमागून दरवाजा बंद केला होता. त्यानंतर त्याने तिच्यावर बलात्कार केला.
अत्याचार झाल्यानंतर आरोपी बसमधून उतरून निघून गेला. त्यानंतर मुलगीही बसमधून खाली उतरली. ती दुसऱ्या बसमध्ये बसून आपल्या गावी जात होती, तेव्हा तिने एका मित्राला फोन लावला आणि घडलेला प्रसंग सांगितला. मित्राने सांगितल्यावर ही तरुणी पोलfस ठाण्यात आली आणि पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला.पीडित तरुणीने तक्रार दिल्यानंतर आम्ही लगेच स्वारगेट एसटी डेपोचे सीसीटीव्ही फुटेज बघितले. यामध्ये आरोपी दत्तात्रय गाडेची ओळख पटली. आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार असून तो पुणे ग्रामीण पोलिसांच्या हद्दीतील आहे. तो मूळचा शिरुरचा आहे. त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. आरोपीला शोधण्यासाठी 8 पथके करण्यात आली आहेत. आरोपीचा युद्ध पातळीवर शोध घेतला जात आहे. आम्ही आसपासच्या शेतांमध्येही श्वान पथकाच्या मदतीने तपास करत आहोत, असे पोलिसांनी या प्रकरणी सांगितले आहे.

