मुंबई: संत तुकाराम महाराजांचे ऐतिहासिक ‘आजोळ’ असलेल्या श्री क्षेत्र लोहगाव येथे भव्य स्मारक आणि पर्यटनस्थळ उभारण्याची मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली. त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून, लवकरच यासंदर्भातील कार्यवाही पूर्ण केली जाईल, असे आश्वासन दिले आहे.
श्री क्षेत्र लोहगाव हे संत तुकाराम महाराजांच्या वास्तव्याने पावन झालेले ठिकाण असून, आषाढी व कार्तिकी एकादशीसह विविध धार्मिक उत्सवांमध्ये येथे मोठ्या संख्येने भाविक भेट देतात. या पार्श्वभूमीवर हरणतळे लगत असलेल्या शासकीय जागेत संत तुकाराम महाराजांचे भव्य स्मारक आणि पर्यटनस्थळ उभारण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
स्मारकाच्या उभारणीमुळे भाविकांसाठी अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध होतील, तसेच या स्थळाची ओळख तीर्थक्षेत्र म्हणून अधिक दृढ होईल. यासह, राज्यभरातील भाविक आणि पर्यटकांना येथे येण्यास प्रवृत्त करता येईल. विशेष म्हणजे श्री क्षेत्र लोहगाव गावास ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा प्राप्त झाला असल्याने, या स्मारकाच्या माध्यमातून संत तुकाराम महाराजांचा वारसा उजळण्यास आणि नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यास मदत होईल.
या महत्त्वपूर्ण मागणीवर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सकारात्मक प्रतिसाद देत, लवकरच आवश्यक पावले उचलण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे लोहगाव येथे भव्य स्मारक आणि पर्यटनस्थळ उभारणीचा मार्ग सुकर होण्याची शक्यता आहे, असे आमदार पठारे यांनी सांगितले.