मुंबई: पुणे महानगरपालिका हद्दीतील थकीत मिळकतधारकांना दिलासा देण्यासाठी ‘अभय योजना’ लागू करण्याची मागणी राज्य शासनाकडे करण्यात आली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री मा. अजित पवार यांची मुंबई येथे भेट घेऊन या मागणीसंदर्भात आमदार बापुसाहेब पठारे यांच्यातर्फे निवेदन सादर करण्यात आले.
मुंबई येथे काल (दि. २५) आमदार बापूसाहेब पठारे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मंत्रालयात भेट घेतली. भेटीदरम्यान, पुणे महापालिका हद्दीतील थकित मिळकतधारकांसाठी अभय योजना लागू करण्यासंदर्भात विस्तृत चर्चा झाली. अजित पवार यांनी संबंधित मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे समजते.
पुणे महानगरपालिका हद्दीतील मिळकतधारकांनी गेल्या अनेक वर्षापासून विविध कारणांमुळे मिळकतकर भरला नाही, त्यामुळे त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात व्याज व दंड आकारला जात आहे. त्यामुळे थकबाकीची रक्कम मोठ्या प्रमाणावर थकीत असून नागरिक ती भरण्यास तयार नसल्याचे निदर्शनास येत आहे. यामुळे महापालिकेला कर संकलन करण्यास अडचणी निर्माण होत आहे. या करामुळे थकीत मिळकतधारक नागरिकांचे मोठे आर्थिक नुकसान होवू शकते. त्यामुळे थकीत करदात्याला न्याय देण्यासंबंधी शासनाने ‘अभय योजना’ आणल्यास गोर- गरीब नागरिक संबंधित योजनेच्या माध्यमातून मिळकत कर भरतील व त्यामुळे महापालिकेलाही जास्तीत- जास्त कर संकलन प्राप्त होण्यास मदत होईल असे, असे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.
“या संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी सविस्तर आणि सकारात्मक चर्चा झाली असून, लवकरच या मागणीवर योग्य पाऊल उचलले जातील, असे आश्वासन त्यांनी दिले. तसेच, या मागणीचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही सुपूर्द करण्यात आले आहे. त्यामुळे लवकरच या योजनेला राज्य शासनाची मंजुरी मिळण्याची अपेक्षा आहे” असे आमदार पठारे म्हणाले.