पुणे-खेडमध्ये अनधिकृत बांधकाम आणि विनापरवाना असलेल्या एका रिसॉर्टवर महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांची पार्टी रंगल्याचा व्हिडीओ समोर आला आहे.विशेष म्हणजे काही महिला अधिकारी यात न्र्त्यावर ठेका धरताना दिसत असल्याचा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी त्यांच्या सोशल मिडियावर हा व्हिडीओ पोस्ट करत गंभीर आरोप केला आहे. पुण्यात अनेक ठिकाणी अनधिकृत बांधकामांवर कारवाईचा बडगा उगारत असल्याच्या घटना समोर येत आहेत. तर दुसरीकडे ही घटना समोर आली असता संताप व्यक्त केला जात आहे.
जनता कर भरते, महसूल अधिकारी अनधिकृत रिसॉर्टवर मौज करतात, असा आरोप वडेट्टीवार यांनी करत पार्टीचे काही व्हिडीओ शेअर केले आहेत. उपविभागीय अधिकारी, उपजिल्हाधिकारी आणि तहसीलदार सारख्या पदावरील अधिकारी नृत्यात सहभागी झाले असल्याचा दावाही वडेट्टीवार यांनी केला आहे.
विजय वडेट्टीवर यांनी पोस्टमध्ये नेमकं काय म्हटलं आहे?
अनधिकृत रिसॉर्टवर महसूल अधिकाऱ्यांची पार्टी?? जनता कर भरते, महसूल अधिकारी अनधिकृत रिसॉर्टवर मौज करतात!
पुण्यातील खेडमध्ये महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांची पार्टी रंगली, आणि त्यात उपविभागीय अधिकारी, उपजिल्हाधिकारी XXXXX आणि तहसीलदार XXXXX डान्स करत सहभागी झाले.
ही पार्टी ज्या रिसॉर्टमध्ये झाली, ते रिसॉर्टच अनधिकृत असल्याचा आरोप आहे! एकीकडे सामान्य नागरिकांवर लहानसहान कारणांसाठी कारवाई केली जाते, अनधिकृत बांधकामे तोडली जातात, तर दुसरीकडे महसूल अधिकारीच अनधिकृत रिसॉर्टवर मजा करत आहेत.
महसूल मंत्र्यांच्या खात्यात काय सुरू आहे, याकडे लक्ष आहे का?