पुणे-मित्राच्या मदतीने पतीचा खून केल्यानंतर राजस्थान येथून पसार झालेल्या महिलेला व तिच्या मित्राला बंडगार्डन पोलिसांनी पुणे स्टेशन भागातून अटक केली. राजस्थानमधील पाली जिल्ह्यातील सोजत सिटी या गावात (दि.२०) ही घटना घडली होती. घटनेनंतर दोघेही पसार झाले होते.
सुखीदेवी कमलेश मेवाड (३०, रा. सोजत सिटी, राजस्थान), अशोक काळुराम राठोड (२५, रा. सोजत सिटी, राजस्थान) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. तर, कमलेश जेठाराम मेवाड असे खून झालेल्याचे नाव आहे. याबाबत जेठाराम मेवाड यांनी सोजत सिटी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
फिर्यादी जेठाराम यांचा मुलगा कमलेश हा काही दिवसांपासून बेपत्ता होता. २० तारखेला एका शेतामध्ये त्याचा मृतदेह आढळून आला. दाखल गुन्ह्याच्या तपासात हा खून कमलेश याची पत्नी सुखीदेवी व तिचा मित्र अशोक यांनी संगणमताने केल्याची माहिती सोजत सिटी पोलिसांना मिळाली. तेव्हापासून ते आरोपींचा शोध घेत होते. दरम्यान, खून प्रकरणातील आरोपी महिला व तिचा मित्र हे पुणे स्टेशन भागात असल्याची माहिती बंडगार्डन पोलिसांना मिळाली. त्यानूसार पथकाने स्टेशनजवळील जयप्रकाश गार्डन येथून दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे केलेल्या तपासात त्यांनी गुन्हा केल्याची कबूली दिली.
परिमंडळ दोनच्या पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहायक आयुक्त दिपक निकम, वरिष्ठ निरीक्षक रविंद्र गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक स्वप्निल लोहार, प्रदीप शितोळे, सारस साळवी, ज्ञानेश्वर बडे, ज्ञानेश्वर गायकवाड यांच्यासह पथकाने ही कामगिरी केली.
