पुणे-छावा चित्रपटामुळे छत्रपती संभाजी महाराजांशी झालेला दगाफटक्याचा मुद्दा चर्चेत आला आहे. या प्रकरणी काहीजण ब्राह्मण कारभाऱ्यांना दोष देतात, तर काहीजण शिर्के घराण्याला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करतात. पण लेखक विश्वास पाटील यांनी या प्रकरणी केवळ ब्राह्मण किंवा मराठा सरदारांना दोष देऊन उपयोग नसल्याचे नमूद करत संभाजी महाराजांशी सर्वच जातीधर्माच्या लोकांनी दगाफटका केल्याचा दावा केला आहे.
विश्वास पाटील म्हणाले, अलीकडे छत्रपती संभाजी महाराज यांच्या घातपातास कोण जबाबदार आहे? अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. काहीजण मार्टिन नामक फिरंगी साहेबाची दैनंदिनी दाखवतात. पण मित्रहो माफ करा. हा मार्टिन एवढा मूर्ख आणि गैरजबाबदार होता की, त्याची डायरी पाहिली तर त्याने संभाजी महाराजांविषयी एवढे निंदक उद्गार काढले आहेत, एवढे अकलेचे तारे तोडलेले आहेत की, ते तुम्हाला वाचताही येणार नाही. या निमित्ताने मला महाराष्ट्राला सांगायचे आहे की, छत्रपती शिवाजी महाराज किंवा संभाजी महाराजांच्या नशिबात जे काही घातापाताचे प्रसंग आले, त्यात सर्व जातीधर्माची माणसे सामील आहेत.
फक्त एकटे ब्राह्मण कारभारी किंवा एकटे मराठा सरदार अथवा फक्त मुस्लीम न्यायाधीश नाहीत. सर्व जातीधर्माच्या लोकांनी मोठ्या व छोट्या महाराजांशी दगाफटका केला होता. संभाजी महाराजांनी काही कारभाऱ्यांना हत्तीच्या पायाखाली घातले होते. हा प्रसंग सर्वांना माहिती आहे. पण नंतर जी मोठी गद्दारी झाली ती ऑक्टोबर 1684 मध्ये झाली. हा फंद फितुरीचा दुसरा प्रकार होता. ही फितुरी संभाजीराजांच्या लक्षात येताच त्यांनी मानाजी मोरे, गंगाधर पंडीत व वासुदेव पंडित, शाहूजी सोमनाथ आदींना अटक केली होती. म्हणजे यात मराठे व ब्राह्मणही आहेत.
या लोकांना 1684 ला कैद करण्यात आले. नंतर त्यांची सुटका संभाजीराजांचा अंत झाल्यानंतर झाली. तोपर्यंत हे गद्दार तुरुंगातच होते. पुढे संभाजी महाराजांची 3 फेब्रुवारीची दुर्दैवी घटना होण्यापूर्वी 15-20 दिवस अगोदर प्रल्हाद निराजी नामक आपले न्यायाधीश औरंगजेबाला जाऊन मिळाले होते. संभाजी महाराज रायगडाच्या गादीवर येऊ नये म्हणून कारभाऱ्यांनी जो कट रचला होता. त्यात प्रल्हाद निराजी होते. संभाजीराजेंनी त्यांना माफ केले होते. त्यानंतर त्यांनी पुन्हा न्यायाधीश पद भूषवले, पण नंतर पुन्हा त्यांनी दगाफटका केला.
काजी हैदर औरंगजेबाला जाऊन मिळाला
शिवरायांनी रायगडच्या मुख्य न्यायाधीशपदी काजी हैदर नामक मुस्लीम व्यक्तीची नियुक्ती केली होती. ते शिवरायांची एकनिष्ठ राहिले. पण संभाजीराजांच्या काळात ते मोगलांना जाऊन मिळाले. याचा अर्थ असा की, संभाजीराजांच्या मार्गात सर्व जातीधर्माच्या लोकांनी दगाफटका केला आहे. तो वतन, जहागिरी व पैशांसाठी केला. सर्व जातीची माणसे यात सामील होती. हा मानवी खेळ आहे. आजही वर्षानुवर्षे चुलते-पुतणे एकत्र असतात, पण सत्तेचा प्रश्न आला की त्यांच्यात भेदभाव निर्माण होतो. हा मानवी धर्म आहे.
या निमित्ताने आपल्याला मान्य करावे लागेल की, संभाजीराजे हे केवळ वीर, पराक्रमीच नव्हते तर उत्तम शासक होते. शाहू महाराजांच्या काळात राधानगरीचे धरण झाले. परंतु संभाजी महाराजांच्या काळात विशाळगडाजवळ शेतकऱ्यांसाठी पहिला बांध घातला. धरण बांधण्याचा हा पहिला प्रयोग होता. संभाजी महाराजांनी कुडाळ व कोकणातील एक-दोन ठिकाणी तोफांचे कारखाने काढले होते. काही नाटककारांनी संभाजीमहाराजांना बायाबापड्यांच्या नावाने बदनाम केले. परंतु, ‘श्री सखी राज्ञी जयती’ नावाचा किताब आपल्या पत्नीला देणारे व स्त्री जातीला राजकारभाराची वरची पायरी देणारे ते तत्कालीन पहिले राजे होते, असे विश्वास पाटील यांनी म्हटले आहे.
शिर्क्यांच्या मुलूखातून संभाजी महाराजांना ओढून नेत असताना कुणीच अडवले नाही
एखादा वटवृक्ष मोडून पडावा असा अंत संभाजीमहाराजांचा झाला. त्यांना शिर्क्यांच्या मुलूखातून 12 तास ओढत नेण्यात आले. जे लोक म्हणतात की, शिर्क्यांनी दगाफटका केला नाही, नसेल केला, त्याला डायरेक्ट पुरावा नाही. पण शिर्क्यांच्या मुलूखातून त्यांना एवढे 10-12 तास ओढून नेत असताना मोगलांना कुणीही अडवले नाही. म्हणूनच महाराष्ट्रातील सर्वच जातीधर्मांनी महाराजांशी बेईमानी केली असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. या विषयावर चर्चा करताना आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, 3 फेब्रुवारीला घातपाताने संभाजीराजांना कैद झाली. त्यावेळी संभाजीराजे व कवी कलश यांच्या अश्वानींसुद्धा तीव्र प्रतिकार केला होता.
मराठ्यांनी म्हणावा तसा प्रतिकार केला का?
कैद झाल्यानंतर राजांना संगमेश्वर येथून प्रचितगडावर नेण्यात आले. नंतर कराड, श्यामगावची खिंड, वडूज, मसवड, दहिवडे, अकलूज, बहादुर गड (अहिल्यानगर) येथे भीमेच्या काठी आणण्यात आली. तिथे त्यांची घृणास्पद वागणूक देण्यात आली. 11 मार्च रोजी औरंगजेबाने त्यांना भीमेच्या काठी त्यांची हत्या केली. या सर्व 300-400 किलोमीटरच्या प्रवासात मराठ्यांनी म्हणावा तसा प्रतिकार केला का? मी काही लोककथा व गाण्यांचा शोध घेतला. मोगल सैनिक संभाजीमहाराजांना कैद करून घेऊन जात होते, तेव्हा कराड जवळ काही धनगर मुलांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. हे इतिहासात नाही. हा प्रसंग मला लोककथेमध्ये मिळाला.
रायप्पा महाराने वाचवण्याचा प्रयत्न केला
बहादुर गडावर रायप्पा महार नामक व्यक्ती संभाजी महाराजांना वाचवण्याचा प्रयत्न करतो. हा प्रसंगसुद्धा लोककथेतला आहे. इतिहासातील नाही. पण रायप्पा महारांसारखे अनेक महार, अनेक कुंभार, अनेक कोळी आदी अठरापगड जातीचे लोक स्वराज्यासाठी झटत होते हे आपण विसरता कामा नये. महाराज ज्या पालखीत बसत होते, त्या पालखीला भोई खांदा देत होते. ते भोई कुठल्या जातीचे? हिंदवी स्वराज्य हे केवळ ब्राह्मण किंवा मराठ्यांनी सांभाळले नाही तर सर्वच जातीधर्माच्या लोकांनी सांभाळले व मोठे केले हे आपल्याला विसरून चालणार नाही. आणि ती धिंड.
विदुषकी टोपी घालून मिरवणूक काढण्यात आली
बहादुर गडावर ज्यावेळी संभाजी महाराजांना आणण्यात आले त्यावेळी विदुषकासारखा पेहराव त्यांना घालण्यात आला. त्यापूर्वी रस्त्यात त्यांना मोठी मारहाण झाली होती. एका मरतुकड्या उंटीणीच्या पाठीवर त्यांना उलटे बसवण्यात आले. त्यानंतर 15 फेब्रुवारीला डोक्यावर घुंगराची विदुषकी टोपी घालून संभाजी महाराज व कवी कलश यांची मिरवणूक काढण्यात आली. छत्रपती संभाजी महाराजांसोबत मृत्यूच्या महामंदिराबरोबर चालत गेलेला महापुरुष कोण? असा मला प्रश्न कुणी विचारला तर मी कवी कलश यांचे नाव घेईन, असेही विश्वास पाटील आपल्या यूट्यूब चॅनेलवर संवाद साधताना म्हणाले.
संभाजीमहाराज संगमेश्वरला का गेले होते?
विश्वास पाटील म्हणाले, संभाजी महाराजांचा अंत एवढ्या दूर ठिकाणी होण्याचे कारण काय? याविषयी अनेक प्रश्न विचारले जातात. संभाजीमहाराजांचा जीवनांत झाला ते ठिकाणी म्हणजे कोकणातील रत्नागिरीलगतचे संगमेश्वर. इथे महाराज कशासाठी गेले होते? 1988 च्या नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये संभाजीराजांना अचानक संगमेश्वरला म्हणजे शिर्क्यांच्या मुलुखात जावे लागले. शिवचरित्र प्रदीपमध्ये जेधे शकावली छापण्यात आली आहे. ही जेधे शकावली 100 वर्षांपूर्वी जेधेंच्या पूर्वजांनी लोकमान्य टिळकांना देण्यात आली. लोकमान्य टिळकांनी ती भारत इतिहास संशोधक मंडळाकडे गेली. त्यात असा उल्लेख आहे की, शके 1660 म्हणजे नोव्हेंबर-डिसेंबर 1688 कवी कलश यांजवरी शिर्के पारखे झाले. कलश पलून खिलियावरी म्हणजे आजच्या विशाळगडावर गेले. तेच माशी म्हणजे त्याच महिन्यात संभाजी राजे रायगडावरून कलशाच्या मदतीला आले. दोघांनी मिळून शिर्क्यांचा पराभव केला.
संभाजीराजांच्या वर्तनाचा विचार केला तर मराठ्यांचा हा युवराज किती जागृत होता हे लक्षात येईल. त्यादरम्यान विशाळगडावरील एक कडा कोसळला होता. त्यावेळी आजूबाजूच्या गावातील हजारो लोक कामाला लावून संभाजीराजांनी 4 दिवसांच्या आत कडा बांधून काढला. शिर्क्यांचे भांडण हे वतनासाठी होते याचे अनेक पुरावे आहेत. गणोजी शिर्के व संभाजी महाराज यांच्यातील संघर्ष आपल्याला डोळ्याआड करता येणार नाही. कारण, इतिहासच बोलतो. या प्रकरणी त्रयस्थांनी बोलण्याचे कारण नाही. शिर्के यांचा प्रभावली प्रांतातील बराच मुलुख भोसल्यांनी लुटून खराब केला.
विठ्ठल नारायण नामक मौजे पाडली तर्फ देवाळे जमीनदार हा शिर्क्यांना जावून मिळाला. त्यामुळे कवी कलश यांनी त्याची खोती काढून घेतली. म्हणजे जे जे माणूस शिर्क्यांना जाऊन मिळाले त्यांना कैद करण्याचे व त्यांची वतने काढून घेण्याचे काम संभाजीराजांनी केले आहे. एवढा या दोघांमध्ये टोकाचा संघर्ष होता. याचा अर्थ असा की, संभाजीराजांनी शिर्क्यांच्या मुलुखावर कोणा कारभाऱ्याला, कुणा मामलेदाराला किंवा सेवकाला पाठवले नव्हते, तर ते स्वतः तिथे चालून गेले होते. त्यांनी शिर्क्यांच्या अनेक पागा जाळल्या, मोकासे रद्द केले. त्यामुळे संभाजीराजांनी घेतलेले असे अनेक निर्णय आपल्याला विसरुन चालणार नाही, असे विश्वास पाटील म्हणाले.
संभाजीराजांना कैद झाली त्यावेळी त्यांच्यासोबत महाराणी येसूबाई, धर्मगुरू रंगनाथ स्वामी, धनाजी संताजी, मालोजीबाबा घोरपडे हे सेनापती होते. त्यामुळे काही लोक जी टीका करतात की, ते दारुच्या धुंदीत होते किंवा ते कुणाची तरी छेड काढत होते असे काहीही नव्हते. आपल्यासोबत फितुरी होईल याची पूर्ण जाणीव त्यांना होती, असे विश्वास पाटील म्हणाले.