मुंबई-राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सोमवारी मध्यरात्री भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतल्याची मोठी बातमी समोर आली आहे. या भेटीमुळे जयंत पाटील हे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
‘टीव्ही 9 मराठी’च्या वृत्तानुसार, जयंत पाटील यांनी सोमवारी मध्यरात्री चंद्रशेखर बावनकुळे यांची त्यांच्या मुंबई स्थित बंगल्यावर भेट घेतली. भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याने या दोघांची भेट घडवून आणली. या तिन्ही नेत्यांमध्ये जवळपास तासभर चर्चा झाली. या चर्चेचा तपशील पुढे आला नाही, पण ही भेट जयंत पाटील यांच्या संभाव्य भाजप प्रवेशाभोवती फिरती असल्याचा दावा केला जात आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी या भेटीवर भाष्य केले आहे. ते म्हणाले, आम्हाला टीव्हीच्या माध्यमातून जयंत पाटील व चंद्रशेखर बावनकुळे यांची मध्यरात्री भेट झाल्याची माहिती मिळाली आहे. भाजप नेते तथा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी नुकतेच इस्लामपूरच्या दौऱ्यावर गेले होते. तिथे त्यांची जयंत पाटलांशी चर्चा झाली होती. तेव्हाची त्यांची देहबोली बदलल्याची दिसून आली. शरद पवार गटातील नेत्यांकडून होणारा अवमान तथा प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांच्या कारकिर्दीवर उपस्थित केले जाणारे प्रश्नचिन्ह पाहता त्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला असेल. काल ते भेटले असतील तर ही भेट निश्चितच राजकीय दृष्टिकोनातून झाली असेल. अशी कोणतीही शक्यता नाकारता येत नाही. आमची या घटनाक्रमावर करडी नजर आहे.
जयंत पाटील एक मोठे नेते आहेत. त्यांना राजकारणाचाही दांडगा अनुभव आहे. त्यांच्या सारखा मोठा नेता आमच्या पक्षात असेल, तर आनंदच आहे. ते महायुतीमध्ये येणार असतील तर एक घटकपक्ष म्हणून आम्ही त्यांचे स्वागतच करू
दुसरीकडे, शरद पवार गटाचे नेते महबूब शेख यांनी जयंत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा धुडकावून लावली आहे. जयंत पाटील व चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट झाली किंवा नाही याविषयी माझ्याकडे कोणतीही माहिती नाही. ते भेटले असले तरी त्यांनी बावनकुळेंची भेट एक मंत्री म्हणून घेतली असेल. जयंत पाटलांविषयी वावड्या उठवण्याचे काम सुरू असते. पण ते शरद पवारांसोबतच आहेत ही वस्तुस्थिती आहे, असे ते म्हणाले.
महबूब शेख यांनी यावेळी जयंत पाटील गत काही दिवसांपासून पक्षात सक्रिय नसल्याचा आरोपही फेटाळून लावला. जयंत पाटील पक्षात सक्रिय आहेत. आजच त्यांना शरद पवारांसोबत नांदेड व हिंगोली येथे कार्यक्रम होता. पण शरद पवारांना काही कारणांमुळे त्या कार्यक्रमाला जाता आले नाही. पण जयंत पाटील स्वतः त्या कार्यक्रमाला हजर राहिले. काल ते पक्ष कार्यालयात हजर होते. तिथे त्यांनी कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेतल्या. त्यामुळे ते पक्षात सक्रिय नसल्याच्या बातमीत कोणतेही तथ्य नाही. जयंत पाटील हे पवारांसोबत आहेत. ते शेवटपर्यंत त्यांच्यासोबतच राहतील याविषयी कोणतीही शंका नाही, असे शेख म्हणाले.