मुंबई/पुणे -: सॅमसंग सी अँड टी कंपनीच्या ५० कर्मचाऱ्यांनी हॅबिटॅट फॉर ह्युमॅनिटी इंडिया या स्वयंसेवी संस्थेच्या सहकार्याने पालघर जिल्ह्यातील वारली आदिवासी कुटुंबांसाठी घरे बांधण्यासाठी स्वेच्छेने पुढाकार घेतला. या उपक्रमात कर्मचारी दोन टप्प्यांत सहभागी झाले — १ फेब्रुवारी रोजी २५ कर्मचाऱ्यांच्या पहिल्या गटाने, तर १५ फेब्रुवारी रोजी उर्वरित २५ कर्मचाऱ्यांच्या दुसऱ्या गटाने श्रमदान केले. या ५० कर्मचाऱ्यांनी स्वयंसेवक म्हणून तीन वारली आदिवासी कुटुंबांसोबत मिळून सुरक्षित आणि मजबूत घरे बांधण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
श्रमदानाचा हा उपक्रम ‘हॅबिटॅट फॉर ह्युमॅनिटी इंडिया’ आणि ‘सॅमसंग सी अँड टी’ यांच्यात डिसेंबर २०२४ मध्ये जाहीर झालेल्या प्रकल्पाचा भाग आहे. या प्रकल्पाचा उद्देश १५ कुटुंबांसाठी नवीन घरे बांधणे आणि ३ जिल्हा परिषद शाळांमध्ये सुधारित स्वच्छतागृहे निर्माण करून सुमारे ८५० विद्यार्थ्यांना लाभ मिळवून देणे हा आहे.
यासंदर्भात ‘हॅबिटॅट फॉर ह्युमॅनिटी इंडिया’चे राष्ट्रीय संचालक श्री. आनंद कुमार बोलिमेरा म्हणाले, “स्वयंसेवकांद्वारे श्रमदान उर्फ व्हॉलंटीयर बिल्ड (Volunteer Build) हा अभिनव उपक्रम ‘हॅबिटॅट फॉर ह्युमॅनिटी’च्या घरे, समुदाय व आशा यांची निर्मिती करण्याच्या उद्दिष्टाच्या केंद्रस्थानी आहे. ‘सॅमसंग सी अँड टी’च्या कर्मचाऱ्यांनी दाखवलेली समर्पितता आणि उत्साह म्हणजे सामाजिक परिवर्तनासाठीच्या सहकार्याचे एक उत्तम उदाहरण आहे. गरजू कुटुंबांसोबत काम करुन गृहनिर्माण कार्यात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे व त्याबरोबरच या कुटुंबांसाठी एक सुरक्षित आणि उज्ज्वल भविष्यासाठीच्या आशेची पायाभरणी देखील केली आहे. ही भागीदारी स्वयंसेवेच्या माध्यमातून अर्थपूर्ण सामाजिक परिवर्तन घडवून आणण्यात कॉर्पोरेट संस्था आणि व्यावसायिक किती खोल प्रभाव निर्माण करू शकतात हे अधोरेखित करते.”
‘सॅमसंग सी अँड टी इंजिनिअरिंग अँड कन्स्ट्रक्शन ग्रुप’च्या कर्मचाऱ्यांनी घरबांधणीच्या विविध टप्प्यांमध्ये सक्रिय सहभाग घेतला आणि उपेक्षित समुदायांसमवेत घरबांधणीतील आव्हाने पेलण्याचे व त्यावर मात करण्याचे अनुभवात्मक शिक्षण घेतले. त्यांच्या प्रयत्नांनी शाश्वत सामाजिक बदल घडवून आणण्यासाठी कॉर्पोरेट भागीदारी आणि स्वयंसेवकांची भूमिका अधोरेखित केली आणि सक्षमीकरण आणि प्रगतीसाठी आधारस्तंभ म्हणून सुधारित घरांचे महत्त्व दर्शविले.
या उपक्रमामुळे सामाजिक विकासात कॉर्पोरेट क्षेत्रातील कंपन्यांना प्रत्यक्ष सहभागी करून घेण्याच्या ‘हॅबिटॅट फॉर ह्युमॅनिटी इंडिया’ च्या कटिबद्धतेची प्रचिती येते. अनेक कंपन्या आज त्यांच्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (सीएसआर) तसेच पर्यावरणीय, सामाजिक आणि प्रशासकीय (ईएसजी) धोरणांतर्गत सकारात्मक उपक्रम राबवत आहेत. अशा वेळी ‘हॅबिटॅट फॉर ह्युमॅनिटी इंडिया’देखील अल्प-उत्पन्न गटातील कुटुंबांसाठी घरे उभारून त्यांना दीर्घकालीन समाधान उपलब्ध करून देण्यासाठी सामूहिक कृती आणि परिणामकारक उपाययोजनांवर भर देत आहे.