; व्हीलचेअर रेसमधे १०० दिव्यांगांचा सहभाग
पुणे: “प्रयत्नांची पराकाष्ठा, मनातील जिद्द आणि सकारात्मक दृष्टी तुम्हाला यशाच्या मार्गावर घेऊन जाते. जीवनात येणाऱ्या संकटाना आत्मविश्वासाने सामोरे जात प्रामाणिक प्रयत्न केल्यास हमखास यश मिळते,” असे मत माईंड पॉवर ट्रेनर व लेखक डॉ. दत्ता कोहिनकर यांनी व्यक्त केले. एनेबलर चॅरिटेबल ट्रस्ट आणि ‘सक्षम’च्या वतीने प्रथमच व्हीलचेअरवरील दिव्यांग महिला व पुरुष यांच्यासाठी ‘व्हीलचेअर रेस’चे आयोजन केले होते.
एस. पी. कॉलेजच्या मैदानावर या स्पर्धा झाल्या. एकूण १०० दिव्यांग बंधू-भगिनींनी या स्पर्धेत सहभाग घेतला. या स्पर्धा चार गटात झाल्या. स्पर्धक, पालक मिळून २५० जण उपस्थित होते. स्पर्धेचे संपूर्ण आयोजन सीमा दाबके, अमोल शिनगारे, अशोक बोत्रे, संतोष गायकवाड, अभिजित पोवार, निलेश कांबळे, रामा चलवादी, प्रकाश शेलार, अनंत माखे, कासीम शेख, सोहेल मुलानी यांनी केले. अशोक नांगरे, रवींद्र जोशी, प्रशांत पडदे, सेवा चव्हाण, आकाश कासूर्डे यांनी पंच म्हणून काम केले. ‘एमआयटी’च्या नेकी क्लबचे सभासदांनी स्वयंसेवक म्हणून काम केले.
सामान्य दिव्यांग पुरुष गटात अण्णासाहेब वाघमारे (प्रथम), दिपक बेंडाले (द्वितीय), युवराज अहिरे (तृतीय), महिला गटात पद्मा परभणे (प्रथम), वैशाली इंगवले (द्वितीय), भाग्यश्री मोरे (तृतीय), दिव्यांग खेळाडू पुरुष गटात सदाशिव शिंदे (प्रथम), रोहन ढमाले (द्वितीय), सोमनाथ जाधव (तृतीय), महिला दिव्यांग खेळाडू गटात भाग्यश्री मझीरे (प्रथम), रेखा पडवळ (द्वितीय) व तृप्ती चोरडिया (तृतीय) यांनी पारितोषिके मिळवली. प्रथम क्रमांकास ५००० रुपये, द्वितीय क्रमांकास ३००० रुपये, तृतीय क्रमांकास २००० रुपये व सर्वांना ट्रॉफी देऊन गौरवण्यात आले. सहभागी सर्व स्पर्धकांना प्रशस्तीपत्रक देण्यात आले.
स्पर्धेचे उद्घाटन लायन्स क्लबचे माजी प्रांतपाल लायन राजकुमार राठोड यांच्या हस्ते झाले. दिव्यांग विभाग प्रमुख सीमा दाबके, एनेबलर चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष अमोल शिनगारे, स्वाती मोहोळ, सुनील पटवर्धन, दिपीका खिंवसरा, दिपक लोया उपस्थित होते. बक्षिस वितरण माजी नगरसेविका मोनिका मोहोळ, संदीप खर्डेकर यांच्या हस्ते झाले. प्रसंगी मुरलीधर कचरे, अमित बराटे, उदय जगताप, महेश करंदीकर, केतकी कुलकर्णी, बाजीराव पारगे, शिवाजी भेगडे उपस्थित होते.
दिव्यांगांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांना प्रेरणा देणारे उपक्रम सातत्याने घेतले पाहिजेत, असे लायन राजकुमार राठोड म्हणाले. स्पर्धेत सहभाग घेतला म्हणजे स्पर्धा जिंकल्यासारखी आहे. यश, अपयश येत-जात राहते. त्याचा फार विचार न करता प्रयत्न करावेत, असे मोनिका मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले. स्वतःला दिव्यांग समजून मागे राहू नका. अशा उपक्रमात एकत्र या. तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद म्हणजेच उपक्रम यशस्वी झाल्याचे समाधान आहे, अशी भावना संदीप खर्डेकर यांनी व्यक्त केली.