श्री गजानन महाराज सेवाधारी न्यास पुणे च्यावतीने श्री गजानन महाराज (शेगांव) प्रकट दिन उत्सवाचे आयोजन ः ह.भ.प अभय नलगे व सहकाऱ्यांचा सांगितीक कार्यक्रम संपन्न
पुणे ः पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी, जागृती स्वप्नी पांडुरंग… सदनी श्री गजानन आले, आज माझे घर मंदिर झाले… खेळ मांडियेला वाळवंटी घाई, नाचती वैष्णव भाई रे… अशा भक्तीगीतांच्या भावपूर्ण सादरीकरणाने श्री गजानन महाराज (शेगांव) प्रकट दिन उत्साहात साजरा झाला.
श्री गजानन महाराज सेवाधारी न्यास पुणे यांच्यावतीने श्री गजानन महाराज शेगाव १४७ व्या प्रकट दिनानिमित्त उत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. उत्सवानिमित्त भक्ती संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी ह.भ.प. अभय नलगे, कल्याणी शेटे, रेखा मानवतकर यांनी भक्तीगीतांचे सादरीकरण केले. तर प्रसाद भांडवलकर (तबला ), राजेंद्र महाराज बधे (मृदुंग), अश्विनी शेळगे ( टाळ) यांनी साथसंगत केली. एमआयटी महाविद्यालयाचे व्हाईस चान्सलर डाॅ.मिलिंद पांडे आणि संजय जोशी सह प्रा. शुभलक्ष्मी जोशी यांच्या हस्ते लघुरुद्र अभिषेक संपन्न झाला.
कार्यक्रमाची सुरुवात ओंकार प्रधान रूप गणेशाचे… या गणेश वंदनेने झाली. त्यानंतर आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव दैवताचे नाव सिद्धेश्वर… खेळ मांडियेला वाळवंटी घाई, नाचती वैष्णव भाई रे… या गीतांनी कार्यक्रमाचा पूर्वार्ध भक्तीमय झाला.
मदन कस्तुरे म्हणाले, श्री गजानन महाराज यांच्या प्रकट दिनानिमित्त संस्थेच्या वतीने उत्सवाचे आयोजन करण्यात येते. उत्सवाची सुरुवात लघुरुद्र अभिषेकाने झाली. त्यानंतर श्री गजानन विजय ग्रंथातील प्रथम अध्यायाचे वाचन करण्यात आले. तसेच यावेळी श्री गजानन महाराज यांची उपासना करण्यात आली. उत्सवात संत साहित्यावरील व्याख्यान संपन्न झाले. तसेच उत्सवा दरम्यान भक्तांसाठी महाप्रसादाचे देखील आयोजन करण्यात आले होते, असेही त्यांनी सांगितले.