: श्री वृद्धेश्वर सिद्धेश्वर महाशिवरात्र संगीत महोत्सवात ‘रंग उषेचे’ कार्यक्रम संपन्न
पुणे: संगीताच्या माध्यमातून मी अनेक देवी देवतांची गाणी गायली. संगीताद्वारे एक प्रकारे ईश्वर सेवा माझ्या हातून घडली. संगीत हे आमच्या घराण्याच्या मुळामध्येच असून माझ्यासाठी संगीत साधना ही ईश्वर साधना आहे, असे मत ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर यांनी व्यक्त केले.
शिवाजीनगर मधील श्री वृद्धेश्वर सिद्धेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्ट तर्फे आयोजित करण्यात आलेल्या महाशिवरात्र संगीत महोत्सवात ‘रंग उषेचे’ या कार्यक्रमात सिद्धार्थ बेंद्रे यांनी उषा मंगेशकर यांची मुलाखत घेतली, त्यावेळी त्या बोलत होत्या. ट्रस्टचे अध्यक्ष हनुमंत बहिरट पाटील, सचिव सुधीर दुर्गे, खजिनदार शशिकांत भोसले, विश्वस्त महेश दुर्गे, संजय सातपुते यावेळी उपस्थित होते. डाॅ.आसावरी पाटणकर आणि शिष्या यांचा कथ्थक नृत्याचा कार्यक्रम महोत्सवात सादर झाला.
उषा मंगेशकर म्हणाल्या, लता मंगेशकर यांच्या इतका महान गायक आणि विनम्र व्यक्ती मी आतापर्यंत पाहिली नाही ‘ओम नमोजी आद्या’ हे गाणे गाण्यापूर्वी लतादीदी यांनी हे गाणे तुम्ही कशाप्रकारे गाता हे मला शिकवा अशी विनंती केली यातूनच त्यांचा विनम्रपणा दिसतो. त्यांच्यातील साधेपणा आणि विनम्रपणा मी आयुष्यभर माझ्या मध्ये जपण्याचा प्रयत्न केला.
मंगेशकर घराणे हे मंगेशी देवाला म्हणजेच भगवान शंकराला आराध्य मानते. वृद्धेश्वर सिद्धेश्वर महोत्सवाच्या माध्यमातून मी माझ्या संगीताद्वारे भगवान शंकराच्या चरणी सेवा अर्पण करत आहे ही संधी मला दिल्याबद्दल मी देवस्थानची आभारी आहे, अशी भावना ही उषा मंगेशकर यांनी यावेळी व्यक्त केले.
मुलाखती दरम्यान श्री रामचंद्र कृपाळू, ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या, माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची सावली, आम्ही ठाकरं ठाकरं या रानाची पाखरं, निसर्ग राजा ऐक सांगते, झुळझुळ वाहे पुण्याजळाचे निर्झर हो अशा विविध प्रकारच्या गाण्यांच्या सुरेल सादरीकरणाने कलाकारांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले. उषा मंगेशकर यांच्या सह चंद्रशेखर महामुनी आणि नेहा चिपळूणकर यांनीही गाणी गायली.