गांधर्व महाविद्यालय, पुणेतर्फे गुरू गौरव, संगीत गौरव, संगतकार पुरस्करांचे वितरण
पुणे : कलाकार हा कधीच पैशांसाठी, पुरस्कारासाठी किंवा प्रतिष्ठेसाठी कलेचे सादरीकरण करत नसतो. स्वत:ला आनंद मिळावा, तो आनंद इतरांनाही देता यावा यासाठी त्याचा प्रयत्न असतो. रसिकांची दाद म्हणजेच आशीर्वाद, अशा भावना कलाकारांच्या असतात. पुरस्काराने कलाकारांची जबाबदारी वाढते, असे भावोद्गार प्रसिद्ध गायक पंडित विनायक तोरवी काढले.
गांधर्व महाविद्यालय, पुणेतर्फे गुरू गौरव, संगीत गौरव आणि संगतकार पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता. महाविद्यालयाच्या विष्णू विनायक स्वरमंदिरात आयोजित कार्यक्रमात पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर गुरू गौरव पुरस्काराने सुप्रसिद्ध गायक पंडित विनायक तोरवी (बंगळुरू), पंडित विनायक बुवा पटवर्धन संगीत गौरव पुरस्काराने ज्येष्ठ संवादिनी वादक डॉ. अरविंद थत्ते (पुणे), पंडित चंद्रकांत कामत संगतकार पुरस्काराने तबला वादक पंडित रवींद्र यावगल (बंगळुरू) तर पंडित तुळशीदास बोरकर संगतकार पुरस्कराने संवादिनी वादक पंडित अजय जोगळेकर (मुंबई) आणि पंडित विनय मिश्रा (दिल्ली) यांना सन्मानित करण्यात आले. या वेळी सत्काराला उत्तर देताना पंडित तोरवी बोलत होते. पुरस्काराचे वितरण एअर मार्शल (निवृत्त) भूषण गोखले यांच्या हस्ते झाले. महाविद्यालयाचे प्राचार्य पंडित प्रमोद मराठे, उपप्राचार्या परिणिता मराठे उपस्थित होते. संगीत गौरव व गुरू गौरव पुरस्काराने सन्मानित कलाकारांना 21 हजार रुपये तर संगतकार पुरस्कारप्राप्त कलाकारांना 10 हजार रुपये पुरस्काराच्या रूपाने देण्यात आले. गांधर्व महाविद्यालयाचे प्राचार्य पंडित प्रमोद मराठे यांनी प्रास्ताविकात पुरस्कारामागील संकल्पना विशद केली.
ज्येष्ठ संवादिनी वादक डॉ. अरविंद थत्ते म्हणाले, कलेच्या क्षेत्रात माझ्याकडून जे कार्य झाले आहे त्याचे श्रेय माझे आई-वडील, गुरुजन, माझे शिष्य आणि रसिक या सगळ्यांचे आहे. पंडित विनायकबुवा पटवर्धन यांच्या नावाचा पुरस्कार मिळणे ही दडपण येणारी गोष्ट आहे. हा पुरस्कार माझ्या गुरू मालिनीताई राजुरकर आणि गुरुस्थानी असलेल्या कलाकारांना समर्पित करतो.
भूषण गोखले म्हणाले, गांधर्व महाविद्यालयाला मोठा इतिहास असून ते स्वरमंदिरच आहे. महाविद्यालयातील गुरूकुल पद्धत ही एक उत्तम शिक्षणपद्धती आहे. ते पुढे म्हणाले, ज्याचे पाय कायम जमिनीवर असतात त्या व्यक्ती आयुष्यात कायम मोठ्या उंचीवर पोहोचतात. पुरस्कार मिळालेले सर्व कलाकार आपआपल्या क्षेत्रात इतक्या उंचीवर असूनही अतिशय नम्र आहेत. त्यामुळे ते त्यांच्या शिष्यांसमोर आदर्श आहेत.
यावेळी पंडित विनय मिश्रा यांच्या सुरेल एकल संवादिनी वादनाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. आशय कुलकर्णी यांनी तबला साथ केली. पंडित रवींद्र यावगल याचे एकल तबला वादन झाले. त्यांना अभिषेक शिनकर यांनी संवादिनीची साथ केली. दिली. पंडित विनायक तोरवी यांच्या दमदार अशा गायनाने कार्यक्रमाची सांगता झाली. त्यांना पंडित रवींद्र यावगल (तबला), पंडित विनय मिश्रा (संवादिनी) समर्पक साथसंगत केली. मंजिरी धामणकर यांनी सूत्रसंचालन केले.