पुणे- देवेंद्र जोग या मोहोळांच्या कार्यकर्त्याला मारहाण झाल्यावर केंद्रीय मंत्री असलेल्या मोहोळांनी पोलिसांची खरडपट्टी काढल्यावर पोलिसांनी आता वेगाने हालचाली केल्या असून सराईत गुंड गजा मारणे याला अखेर पुणे पोलिसांनी अटक केली आहे. अजून दोघे फरार असून त्यात एक गजा मारणेचा भाचा असल्याचे सांगण्यात येत आहे
दरम्यान भाजप पदाधिकाऱ्याला केलेल्या मारहाण प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. याआधी पुणे पोलिस आयुक्तांकडून टोळीतील चौघांवर मकोका अंतर्गत कारवाई गजा मारणेसह चौघांवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. ज्या गुन्हेगारी टोळ्या शहरात सक्रिय समोर येतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येत आहे, अशी माहिती पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिली आहे.
पोलिस आयुक्त अमितेशकुमार पुढे बोलताना म्हणाले की, कोणी कायदा हातात घेतला तर ते खपवून घेतले जाणार नाही. ही संपूर्ण टोळी पोलिस नेस्तनाबूत करू. या टोळीच्या दहशतीला बळी न पडता नागरिकांनी तक्रार करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन त्यांनी केले आहे. तसेच शहरात कोणती कोयता टोळी सक्रिय नाही असेही त्यांनी म्हटले आहे.
भारतीय जनता पक्षाचा पुणे येथील कार्यकर्ता देवेंद्र जोग यांना झालेल्या मारहाणीच्या घटनेनंतर केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट दिली आहे. या वेळी मुरलीधर मोहोळ यांनी पोलिस आयुक्तांना या प्रकरणात कठोर कारवाई करण्याच्या सूचनाही केल्या आहेत. देवेंद्र सारख्या तरुणाला मारहाण होते, हे कदापि सहन होणार नसल्याचे मोहोळ यांनी म्हटले आहे.
कोथरूड परिसरात गाडीचा धक्का लागल्याने जाब विचारल्यामुळे एका तरुणाला चार जणांनी बेदम मारहाण केली होती. 19 फेब्रुवारी रोजी कोथरूड परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून मिरवणूक निघाली होती, त्यावेळी मिरवणुकीच्या दरम्यान चार जणांनी बाईकवरून जाणाऱ्या देवेंद्र जोग यांना कट मारला. देवेंद्र जोग यांच्याशी त्या चार जणांची वादविवाद झाला आणि या वादेचे रुपांतर मारहाणीत झाले. या प्रकरणी कोथरूड पोलिसांनी चौघांविरुद्ध कलम 307 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
कोथरूड पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे, तर चौथा आरोपी बाबू पवार फरार आहे. बाबू पवार हा कुख्यात गुंड गजानन मारणेचा भाचा असल्याचे सांगण्यात आले आहे. या प्रकरणात आरोपी म्हणून अमोल विनायक तापकीर, ओम तीर्थराम धर्म जिज्ञासू, किरण कोंडीबा पडवळ, आणि बाबू पवार यांचे नावे समोर आले आहेत.

गजा मारणेवर 37 वर्षात तब्बल 28 गुन्हे; पोलिसांच्या माहिती नुसार मारणे टोळीत 72 गुंड सक्रीय गुंड ! खुन, खुनाचा प्रयत्न, गर्दी मारामारी, खंडणी मागण्याच्या गुन्ह्यांचा समावेश
पुणे शहरातील कुख्यात गुंड गजा ऊर्फ गजानन पंढरीनाथ मारणे (वय ५७) याच्यावर गेल्या ३७ वर्षात तब्बल २८ गुन्हे दाखल आहेत. त्याचबरोबर त्याला दोनदा तडीपार करण्यात आले होते. तसेच मोक्काची कारवाई करण्यात आली होती. तळोजा कारागृहातून सुटका झाल्यानंतर त्याच्या समर्थकांनी मुंबई -पुणे एक्सप्रेस हायवेवर त्याची आलीशान मोटारीतून भव्य मिरवणुक काढली होती. या मिरवणुकीद्वारे त्याने जणू पोलिसांनाच शह दिल्याचे मानले गेले. त्यामुळे पुणे शहर, पिंपरी चिंचवंड पोलीस आणि ग्रामीण पोलिसांनी त्याच्यासह समर्थकांवर वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले होते. त्यामुळे तो फरार झाला होता. पुणे ग्रामीण पोलिसांनी त्याला सातारा जिल्ह्यात पकडले. त्याला एमपीडीए खाली एक वर्ष स्थानबद्ध केले होते. त्यानंतर पोलिसांनी या रॅलीत सहभागी असलेल्या ५० वर गाड्या जप्त केल्या होत्या. आता पोलीस या मारहाणीच्या वेळी ताफ्यामध्ये सहभागी असलेल्या कार व दुचाकी यांचा सीसीटीव्हीमार्फत शोध घेऊन त्या जप्त करण्याची कारवाई करणार आहेत. पोलिसांच्या माहिती नुसार गजा मारणे टोळीत 72 सक्रीय गुंड आहेत.
मुळशी तालुक्यातील मुळचा गजा मारणे हा कोथरुडमधील शास्त्रीनगर येथे राहण्यास आला. १९८८ साल संपत असताना त्याच्यावर मारामारीचा पहिला गुन्हा डेक्कन पोलीस ठाण्यात दाखल झाला होता. त्यानंतर १९९० मध्ये डेक्कन पोलीस ठाण्यात मारामारीचे दोन तर समर्थ पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला होता. १९९१ मध्ये दोन मारामारीचे गुन्हे डेक्कन पोलीस ठाण्यात दाखल झाले होते. त्यामुळे त्याला १९९१ मध्ये २ वर्षांसाठी तडीपार करण्यात आले होते. त्यानंतर तीन चार वर्ष शांततेत गेली. कोथरुड पोलीस ठाण्यात १९९६ मध्ये खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला होता. त्याची गुन्हेगारी वाढत असल्याने त्याच्याकडून २००८ मध्ये १ वर्षाचा बाँड घेण्यात आला होता. तरीही त्याचे गुन्हे करणे सुरुच असल्याने २०१२ मध्ये पुन्हा एक वर्ष तडीपार करण्यात आले. प्रत्येक गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याच्यावर ११० प्रमाणे प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती.
गजा मारणे याच्यावर आतापर्यंत डेक्कन, कोथरुड, सासवड, दत्तवाडी, पौड, कामोठा, शिरगाव, हिंजवडी, भारती विद्यापीठ पोलीस ठाणे अशा वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात २८ गुन्हे दाखल आहेत. त्याविरुद्ध ३१ जुलै २०२४ रोजी शेवटची चॅप्टर केस करण्यात आली होती.
मुळचा मुळशी तालुक्यातील राहणारा असल्याने गजा मारणेने मुळशीतील जमीन विक्रीमध्ये लक्ष घातले. तेथील जमिनीचे व्यवहार हे आपल्यामार्फतच व्हावेत, यासाठी त्याने शेतकर्यांवर दहशत निर्माण केली.
गजा मारणे याने आपली टोळी निर्माण केल्याने त्याची कोथरुड परिसरात मोठी दहशत आहे. त्यातूनच त्याने अनेक राजकीय नेत्यांना हस्तेपरहस्ते मदत करण्याचा प्रयत्न केला. त्याने राजकीय पाठिंबा मिळविण्याचा प्रयत्न केला.
अनेक जण गजा मारणे याची घरी जाऊन भेट घेत असतात. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ यांनीही काही महिन्यांपूर्वी गजा मारणे याची घरी जाऊन भेट घेतली. त्याची मोठी चर्चा झाली होती. लोकसभा निवडणुकीनंतर खासदार निलेश लंके यांनी भेट घेतली होती.
राजकारणात सक्रीय होण्यासाठी त्याने अनेकदा प्रयत्न केले. त्यासाठी आपली ओळख गुंड, दादा याऐवजी महाराज म्हणवून तो घेऊ लागला होता. परंतु, एखादे प्रकरण होते आणि त्यातून त्याची गुंड, टोळीप्रमुख म्हणून प्रतिमा पुन्हा समोर येते.
तळोजा कारागृह ते पुणे अशी काढलेल्या रॅलीमुळे गजा मारणे याचे नाव राज्यात सर्वत्र झाले. या रॅलीमध्ये सहभागी गाड्या पोलिसांनी जप्त केल्या होत्या.
त्याचप्रमाणे शिवजयंतीच्या दिवशी सिटी प्राईड कोथरुड येथे गजा मारणे व त्याच्या टोळीतील सदस्य चित्रपट पाहण्यास गेले होते. तेथून त्याच्या गाड्याचा ताफा कोथरुडमधील भेलकेनगर चौकात येऊन थांबला होता. त्यावेळी पुढे जाण्याचा प्रयत्न देवेंद्र जोग यांनी केला. या किरकोळ कारणावरुन गजा मारणे टोळीतील गुंडांनी बेदम मारहाण केली. आता पोलीस या मारहाणीच्या वेळी ताफ्यामध्ये सहभागी असलेल्या कार व दुचाकी यांचा सीसीटीव्हीमार्फत शोध घेऊन त्या जप्त करण्याची कारवाई करणार आहेत.
पोलीस ठाण्यात झाला स्वाधीन, २८ वा गुन्हा
कोथरुड येथील आय टी इंजिनिअरला मारहाण केल्याप्रकरणी पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी अतिशय कडक भूमिका घेतल्यानंतर गजा मारणे व रुपेश मारणे यांना त्या गुन्ह्यात पोलिसांनी आरोपी केले़ त्यानंतर गजा मारणे हा स्वत: पोलीस ठाण्यात हजर झाला़ पोलिसांनी त्याला अटक करण्याची कारवाई सुरु केली आहे़ त्याच्यावरील हा २८ वा गुन्हा आहे़गजा मारणे व त्याच्या टोळीतील २७ जणांवर कारवाई करणाऱ त्यांची मालमत्ता जप्तीसाठी प्रयत्न सुरु असल्याची माहिती पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी आज वार्तालाप कार्यक्रमात दिली होती़ त्यानंतर काही तासात गजा मारणे हा स्वत: पोलीस ठाण्यात हजर झाला आहे़ त्याच्याविरुद्ध १९८८ पासून एकूण २७ गुन्हे दाखल आहेत़ त्याच्यावर दोनदा तडीपाराची कारवाई करण्यात आली असून एकदा स्थानबद्ध केले आहे़ अशा प्रकारे त्याच्यावर १२ वेळा वेगवेगळी प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे.