पुणे-सार्वजनिक ठिकाणी अनधिकृतपणे फ्लेक्स लावणार नसल्याची घोषणा कसबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार हेमंत रासने यांनी आज पत्रकार परिषदेत केली.
रासने यांचे निवेदन
स्वच्छ, सुंदर, विकसित कसबा अभियानाअंतर्गत स्वच्छ भारत स्पर्धेत सातत्याने सात वर्षे पहिला क्रमांक मिळणाऱ्या इंदूर शहराचा काही दिवसांपूर्वी स्वच्छता कर्मचाऱ्यांसह अभ्यास दौरा केला.
माहिती तंत्रज्ञानाच्या सहाय्याने सुनियोजित, गतिमान प्रशासकीय उपाययोजना, प्रबळ राजकीय इच्छाशक्ती, लोकसहभाग आणि फ्लेक्समुक्त शहर ही इंदोरच्या यशाची चतु:सूत्री असल्याचे निदर्शनास आले.
लोकसहभागाची सुरुवात मी स्वतः पासून करण्याचे ठरविले आहे. या अभियानात खारीचा वाटा म्हणून सार्वजनिक ठिकाणी अनधिकृतपणे फ्लेक्स लावणार नसल्याचा निर्णय मी घेतला आहे. स्वच्छता, आरोग्य, पर्यावरण आणि वाहतुकीची कोंडी टाळण्याबरोबर परिसराच्या सौंदर्यात भर पडण्यास या निर्णयामुळे मदत होईल असा विश्वास मला वाटतो.
या अभियानाच्या यशस्वीतेसाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. गेल्या तीन महिन्यात मतदारसंघातील कचऱ्याची साठवणूक होणारे 26 क्रॉनिकल स्पॉट सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर बंद करण्यात यश मिळाले आहे.
राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या जयंतीनिमित्त येत्या बुधवारी (26 फेब्रुवारी) सायंकाळी 5 ते 7 या वेळेत या 26 ठिकाणी ‘स्वच्छता नारायणा’च्या महापूजा आयोजित करण्यात आल्या आहेत. स्वच्छतेसाठी आवश्यक असणाऱ्या साहित्याचे पूजन या वेळी केले जाणार आहे.
या उपक्रमाचा शुभारंभ सकाळी 11 वाजता न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग शाळेजवळ विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात येणार आहे.
अभियानात अधिकाधिक लोकसहभाग वाढविण्याच्या उद्देशाने या अभिनव स्वच्छता नारायण महापूजा उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असून नागरिकांनी त्यात मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा असे आवाहन मी करतो.
जे क्रॉनिकल स्पॉट बंद केले आहेत, त्या ठिकाणी नागरिकांनी कचरा टाकू नये यासाठी जनजागृती करण्यात येत आहे. तसेच आवश्यकतेनुसार कर्मचाऱ्यांची संख्या वाढविली असून काही भागात दोन वेळा कचरा संकलित करण्यात येत आहे. या संपूर्ण प्रक्रियेला पुढील काळात माहिती तंत्रज्ञानाची जोड दिली जाणार आहे. कचरा मुक्त झालेल्या परिसराचे लवकरच सुशोभीकरण करण्यात येणार आहे.
स्वच्छ, सुंदर कसबा अभियान गती घेत असताना विकसित कसबा साकारण्याच्या उद्देशाने गेली तीन महिने मतदार संघातील विविध स्तरांवरील नागरिकांशी सतत संपर्क साधला. त्यानुसार पुढील पाच वर्षांसाठी विकसित कसब्यासाठीचे प्राधान्यक्रम निश्चित केले असून, त्या संदर्भात मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्याशी सविस्तर चर्चा केली आहे. आगामी काळात या विकास कामांचा पाठपुरावा करणार आहे.
१) स्वच्छ, सुंदर आणि विकसित कसबा अभियान
२) मराठा साम्राज्याच्या जाज्वल्य इतिहासाचे प्रतीक असणाऱ्या शनिवारवाड्याचे पुनरुज्जीवन
३) वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी सारसबाग ते शनिवारवाडा (बाजीराव रस्ता) आणि शनिवारवाडा ते स्वारगेट (छत्रपती शिवाजी महाराज रस्ता) भुयारी मार्ग
४) सारसबाग आणि पेशवे उद्यानाचा एकात्मिक विकास
५) ऐतिहासिक वास्तूंच्या परिसरातील जुन्यावाड्यांचा प्रश्न
६) नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधेसाठी डॉ.कोटणीस आरोग्य केंद्राचा पुनर्विकास
७) खडक पोलीस वसाहतीतील धोकादायक इमारतींची पुनर्बांधणी
८) मामलेदार कचेरी येथील रखडलेले शासकीय इमारतींचे बांधकाम
९ ) दुरावस्था झालेल्या पुणे महानगरपालिका वसाहतींचा पुनर्विकास
१०) नेहरू स्टेडियमचा खेळासाठी विकास
११) लोकमान्यनगर भागातील म्हाडा प्रकल्पाचा एकात्मिक विकास
१२) श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिर विस्तारासाठी शासकीय जागा हस्तांतरित करण्याची विनंती
१३) श्री कसबा गणपती मंदिर, श्री ओमकारेश्वर मंदिर, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर यांना ब वर्ग दर्जा मिळणे बाबत