सुनील देशमुख लिखित ‘विदेशमुखी’ यशोगाथाचे प्रकाशन
पुणे, ता. २४: “विद्येचे माहेरघर अशी ओळख असलेले पुणे आता औद्योगिक नगरी म्हणूनही ओळखले जाऊ लागले आहे. इथली हवा, माती ही वेगळीच असून, पुणे शहराला एक वैभवशाली वारसा आहे. या पुण्याने अनेकांना घडवले असून, यशाच्या उत्तुंग शिखरावर नेले आहे,” असे प्रतिपादन सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचे संस्थापक डॉ. शां. ब. मुजूमदार यांनी व्यक्त केले. जर मी पुण्यात आलो नसतो, तर सिम्बायोसिस संस्था सुरू करू शकलो नसतो, असेही डॉ. मुजुमदार म्हणाले.
जिद्द आणि उमेदीने संघर्षाशी दोन हात करून आयुष्याला प्रेरणादायी यशोगाथा बनवलेल्या लेखक सुनील देशमुख लिखित ‘विदेशमुखी’ पुस्तकाचे प्रकाशन डॉ. मुजुमदार यांच्या हस्ते झाले. सेनापती बापट रस्त्यावरील सुमंत मुळगावकर सभागृहात झालेल्या या सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून माहिती तंत्रज्ञान तज्ज्ञ डॉ. दीपक शिकारपूर, लेखक सुनील देशमुख, प्रकाशक अमलताश बुक्सचे सुश्रुत कुलकर्णी उपस्थित होते.
डॉ. शां. ब. मुजूमदार म्हणाले, “तुमच्यात किती जिद्द, चिकाटी आहे, यावरच तुमचे यश अवलंबून असते. प्रत्येकाने हार न मानता चिकाटीने आपल्या क्षेत्रामध्ये कार्य करत राहिले पाहिजे. मात्र, असे करत असताना इतरांशी संवाद साधताना नम्रता बाळगलीच पाहिजे. काणतेही क्षेत्र असो हतोटी, सचोटी, कसोटी आणि दुरदृष्टी या चार गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत. या चार गोष्टींचा अवलंब करून कोणत्याही क्षेत्रात उत्तुंग यश प्राप्त करता येऊ शकते. प्रत्येकाने आपले मुल्य वाढवण्यासाठी झटले पाहिजे. स्वतःचे मुल्य वाढवल्यास आपण नक्कीच प्रगती करू शकतो.”
डॉ. दीपक शिकारपूर म्हणाले, “लेखनाला तंत्रज्ञानाची जोड द्यायला हवी. सध्याचा काळ डिजिटल तंत्रज्ञानाचा आहे. युवापिढी वाचनासाठी पुस्तकांबरोबरच तंत्रज्ञानाचाही उपयोग करते. त्यामुळे अधिकाधिक वाचकांपर्यंत पोहोचण्यासाठी पॉडकास्ट, ऑडिओ बुक अशा विविध माध्यमांचा उपयोग केला पाहिजे. संघर्षातूनच आयुष्य घडत असते. त्यामुळे आयुष्यात आलेल्या आव्हानांना आत्मविश्वासाने सामोरे जात प्रगतीच्या दिशेने जात राहावे. सुनील देशमुख यांनी असाच जिद्दीने केलेला हा प्रवास इतरांसाठी प्रेरक राहील, अशी खात्री वाटते.”
सुनील देशमुख यांनी पुस्तकाचा प्रवास उलगडून सांगितला. सिम्बायोसिस संस्थेचा माजी विद्यार्थी म्हणून मुजुमदार सरांकडून प्रेरणा घेतली. जिद्दीने काम करत राहिलो. आयुष्यात अनेक संघर्षाचे क्षण आले, पण त्यात खचून न जाता धैर्याने उभा राहिलो. या प्रवासात अनेकांनी चांगली साथ दिली. त्यामुळे हा प्रवास अधिक सुखद होत गेला, असे देशमुख यांनी नमूद केले. प्रियांका जोशी यांनी सूत्रसंचालन केले. माधुरी देशमुख यांनी आभार मानले.