तरूणाईला बाबा आमटे यांचे विचार दिशादर्शक:डॉ.कुमार सप्तर्षी
पुणे:
बाबा आमटे एकता अभियान ट्रस्टतर्फे दिला जाणारा ‘बाबा आमटे जीवनगौरव राष्ट्रीय पुरस्कार २०२५’ ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि युवक क्रांती दलाचे संस्थापक डॉ. कुमार सप्तर्षी यांना
ज्येष्ठ लेखक डॉ.अच्युत गोडबोले यांच्या हस्ते देण्यात आला.याच कार्यक्रमात ‘बाबा आमटे सामाजिक कार्यकर्ता राष्ट्रीय पुरस्कार’ देवून ओरिसा येथील सामाजिक कार्यकर्ते मधुसूदन दास आणि कोल्हापूर येथील हसन फत्तेखान देसाई यांना संयुक्तपणे गौरविण्यात आले. जीवन गौरव पुरस्काराचे स्वरूप मानपत्र, एक लाख रुपये असे होते , सामाजिक कार्यकर्ता पुरस्काराचे स्वरूप मानपत्र आणि पन्नास हजार रुपये असे होते. अध्यक्ष डॉ.सोमनाथ रोडे हे अध्यक्षस्थानी होते.
हा पुरस्कार वितरण सोहळा रविवार,दि.२३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ४ वाजता गांधी भवन (कोथरूड, पुणे) येथे झाला.
जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सुहिता थत्ते,रुकय्या जोशी,सुहिता थत्ते,डॉ. सोमनाथ रोडे,विजय भारतीय,गिरीश पद्मावार,अनिल हेब्बर,राजन अन्वर,सौ.उर्मिला सप्तर्षी, लक्ष्मीकांत देशमुख,अभय छाजेड,डॉ.मधुसूदन झंवर,अनिकेत लोहिया,माधवी इनामदार,गजानन राऊत,गिरीश पद्मावार,विजय देशमुख,डॉ.प्रवीण सप्तर्षी,जेकब,शुभांगी रोकडे आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.अशोक बेलखोडे यांनी केले.प्रेम कोहाडे यांनी भारत जोडो गीत सादर केले.सुहिता थत्ते, रुकय्या जोशी यांचेही यावेळी भाषण झाले.
सूत्रसंचालन मंदार परांजपे यांनी केले तर आभार प्रदर्शन माधव बावगे यांनी केले.
यावेळी बोलताना डॉ.अच्युत गोडबोले म्हणाले,’आज देशात रोज हजारो गाड्या रस्त्यावर येतात आणि रस्ते गर्दीने वाहनांनी तुंबून जातात. यावर उपाय म्हणून फ्लायओव्हर बांधणे हे उपाय नसून, ते आपल्या चुकीच्या नियोजनामुळे होते आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक बळकट आणि सक्षम करण्याची गरज आहे. संपूर्ण देशात ९० टक्के लोकांचे दरमहा उत्पन्न हे २५ हजार रुपयांहून कमी आहे. सरकारने पुढील वीस पंचवीस वर्षे शिक्षण, आरोग्य, सार्वजनिक वाहतूक आदी समस्यांवर अफाट खर्च केला तरच भारत प्रगती पथावर येऊ शकेल. देशात अंधश्रद्धा, विषमता, बेकारी मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे आजची लोकशाही ही खरी लोकशाही नाही.या धर्मयुद्धाविरोधात आजच्या तरूणांनी निदान विचार केला पाहिजे आणि त्यासाठी आंदोलने उभारली पाहिजे.भारत महासत्ता वगैरे वल्गना आहेत ,सर्व थोतांड आहे, त्यासाठी पुन्हा एकदा सर्वांनी सत्याग्रह चळवळ करण्याची गरज आहे’.
पुरस्कार स्वीकारल्यावर मनोगत व्यक्त करताना डॉ.कुमार सप्तर्षी म्हणाले,’बाबा आमटे मला मानसपुत्र मानत असत आणि मेधा पाटकर यांना मानस कन्या मानत, बाबा आमटे मला वडिलांसारखं मार्गदर्शन करायचे तसेच ते माझ्या राजकीय, सामाजिक आंदोलनात मला मानसिक पाठिंबा देत असत, बाबा आमटे यांच्या भारत जोडो आंदोलनात सहभागी झालेल्यानी आजच्या तरूणांना अशा प्रकारच्या आंदोलनासाठी तयार केले पाहिजे, त्यांनी आजच्या तरूणांचे मार्गदर्शक म्हणून त्यांनी बाबा आमटे झाले पाहिजे’.
हसन देसाई म्हणाले या पुरस्काराने माझ्या जीवनाचे सोने झाले, ‘मी कधीही कुणाला पुरस्कार मिळविण्यासाठी पुढे -पुढे केले नाही’. मधुसूदन दास म्हणाले, ‘बाबा आमटे आज आपल्यात शरीराने नसले तरी त्यांचे विचार आणि त्यांचे मार्गदर्शन, त्यांनी आपल्याला दिलेली स्वप्न, प्रेरणा आपल्याला सतत प्रेरणा देत राहील. सायकलवरून भारत जोडो आंदोलनात सहभागी झालेल्या कार्योकर्तयांनी आजच्या तरूणांना सोबत घेऊन पुन्हा एकदा, महात्मा गांधी, बाबा आमटे यांच्या स्वावलंबी भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण पुन्हा भारत जोडो आंदोलन जोरदारपणे सुरू करण्याची गरज आहे.’

