करमज्योत पुरस्कार आत्मशोधाला प्रवृत्त करणारा : अमृता जोशी
पुणे : “पुरस्कार ही कौतुकाची थाप असतेच, पण योग्य टप्प्यावर मिळणारा पुरस्कार लेखकाला प्रोत्साहन देणारा ठरतो. त्यातही गझलकार सुप्रियास्मृती करमज्योत पुरस्कार माझ्यासाठी अधिक मोलाचा, आनंदाचा आहे. कारण तो आत्मशोधाला प्रवृत्त करणारा आहे”, असे मनोगत प्रसिद्ध कवयित्री, गझलकारा अमृता जोशी यांनी व्यक्त केले.
करम प्रतिष्ठान आयोजित पाचवा मानाचा सुप्रियास्मृती करमज्योत पुरस्कार अमृता जोशी यांना आज (दि.23) प्रदान करण्यात आला. पत्रकार भवन येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. करम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष भूषण कटककर यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. आयोजक प्रज्ञा महाजन, प्राजक्ता वेदपाठक, वैजयंती आपटे आदी उपस्थित होते. सन्मानपत्र, पुष्पगुच्छ, शाल असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
अमृता जोशी म्हणाल्या, “ज्यांच्या स्मृती या पुरस्काराशी निगडित आहेत, त्या सुप्रिया जाधव यांच्याशी माझे कवितेचे नाते जुळले आहे. सुप्रियाताईंच्या लेखनातील सच्चाई मला अतिशय भावते. माझ्या लेखनात अधिक घोटीवपणा, शिस्त हवी, असे त्यांचे सांगणे होते. माझ्या लेखन प्रवासातील हा पहिला पुरस्कार आहे. आपल्या लेखनाची अशी नोंद घेतली जाणे, आनंदाचे तर आहेच, पण अधिक जाणीवपूर्वक लिहिण्याचे भान देणारेही आहे. माझ्या लेखनप्रवासात गझलकार सुनंदा पाटील, शिवाजी काळे, म. भा. चव्हाण यांचे प्रभाव आणि मार्गदर्शन महत्त्वाचे आहे. ज्या मंचावर मी पहिले सादरीकरण केले, त्या करम प्रतिष्ठानतर्फे हा पुरस्कार मिळणे फार आनंदाचे आहे”. अमृता जोशी यांनी मनोगतानंतर सादर केलेली गझल दाद मिळवणारी ठरली.
प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष भूषण कटककर यांनी प्रतिष्ठानच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या व प्रशासक वर्षा कुलकर्णी यांच्या योगदानाची माहिती दिली. “कवितेकडे अतिशय जबाबदारीने पाहणारी व्यक्ती आणि प्रतिष्ठानच्या उपक्रमांमध्ये कमालीचे सातत्य आणि दर्जा जपणारी व्यक्ती म्हणजे वर्षा कुलकर्णी”, असे ते म्हणाले. ऑनलाईन व्यासपीठावर सतत नाविन्यपूर्ण उपक्रम एकहाती करणे, स्वभावातील निगर्वीपणा आणि सेवाकार्याची भावना, हे वर्षाताईंचे वेगळेपण आहे”, असे ते म्हणाले.
प्रज्ञा महाजन म्हणाल्या, “सुप्रिया जाधव यांचा करम प्रतिष्ठानच्या वाटचालीत सिंहाचा वाटा होता. अतिशय समर्पित वृत्तीने त्यांनी कार्य व लेखन केले. त्यांच्या याच वृत्तीचा मागोवा घेत दर्जेदार लेखन करणाऱ्या व्यक्तीला हा पुरस्कार दिला जातो”.
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात निमंत्रित गझलकारांचे सादरीकरण झाले. त्यात मिलिंद छत्रे, भूषण कटककर, अजय जोशी, नचिकेत जोशी, प्राजक्ता पटवर्धन, सुजाता पवार, रेखा येलंबकर, वासंती वैद्य आणि अरुण कटारे यांचा सहभाग होता. अपर्णा डोळे, प्राजक्ता वेदपाठक आणि वैजयंती आपटे यांनी सूत्रसंचालन केले. मुक्ता भुजबले व चिन्मयी चिटणीस यांचा विशेष सहभाग होता. निरुपमा महाजन व वासंती वैद्य यांनी नियोजन केले.

