महाराष्ट्र धर्माचा, मराठी भाषेचा शोध मध्ययुगीन इतिहासापलिकडे जाऊन घेणे आवश्यक
मराठी साहित्या संमेलनात ‘मराठी भाषा व महाराष्ट्र धर्म’ विषयावर परिसंवाद
छत्रपती शिवाजी महाराज साहित्यनगरी (दिल्ली) : छत्रपती शिवाजी महाराज यांनी राजभाषा कोष निर्माण करून मराठी भाषेला सोन्याचे दिवस दाखविले. मराठी साहित्याचा प्रवास, त्याची रुजवात सातवाहन काळात सुरू झाली. या घराण्याने महाराष्ट्राचा पाया रचला असून याचा आज विसर पडलेला दिसतो. मराठी मन आणि भाषा सहिष्णु आहे. मराठी भाषेला दागिना म्हणून मिरवायचे की लोढणे म्हणून ओढायचे हे मराठीजनांनी ठरविणे आवश्यक आहे. धर्माचा जन्म माणसासाठी होतो, माणसाचा धर्मासाठी नव्हे. धर्माची योग्य व्याख्या लोकांपर्यंत पोहोचत नाही. भाषा हा माणसाने लावलेला शोध, संस्कृतीचा ठेवा आहे, असा सूर परिसंवाद उमटला.
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या सरहद, पुणे आयोजित 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ‘मराठी भाषा व महाराष्ट्र धर्म’ या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. यशवंतराव चव्हाण सभामंडपातील लोकशाहीर अण्णा भाऊ साठे मंचावर आयोजित चर्चासत्रात श्रीपाद अपराजित, डॉ. अनिरुद्ध मोरे, अरुणा देशपांडे, संजय सोनवणी, प्रभाकर ओव्हाळ सहभागी झाले होते. श्रीराम पवार अध्यक्षस्थानी होते.
प्रभाकर ओव्हाळ म्हणाले, महाराष्ट्राच्या इतिहासातील संयुक्त महाराष्ट्राची चळवळ ही मराठी भाषेच्या संवर्धनासाठी होती. मराठी भाषेची व्याप्ती शाहिरी रचनांनी वाढविली. आज मराठी भाषा ही प्रमाण भाषा आणि बोली भाषा यांच्या फारकतीमध्ये अडकली आहे. खेड्यापाड्यातील मुलांना प्रमाण भाषा बोजड वाटत असल्याने शिक्षण निरस वाटू लागले आहे. पटसंख्या कमी असल्याने अनेक शाळा बंद केल्या जात आहेत. अशा परिस्थितीत भटक्या, विमुक्त, आदिवासी मुलांनी कसे शिकायचे असा प्रश्नच आहे.
संजय सोनवणी म्हणाले, मराठी भाषा ही संस्कृत भाषेतून निर्माण झालेली नाही. महाराष्ट्र धर्म अर्वाचिन नाही. आज महाराष्ट्र धर्माचे विस्मरण झाले आहे. महाराष्ट्र धर्माचा, मराठी भाषेचा शोध घेताना आपण मध्ययुगीन इतिहासापलिकडे जातच नाही. आज महाराष्ट्रावर, मराठी भाषेवर उत्तरेकडील पगडा मोठ्या प्रमाणात जाणवतो. विचार करणारे, बुद्धी वापरणारे विचारवंत दिसत नाहीत. सांस्कृतिक लढाईला तयार राहण्याची महाराष्ट्राला आज गरज आहे.
श्रीपाद अपराजित म्हणाले, महाराष्ट्र धर्म आणि वर्तमान या विषयी अभ्यास करताना, रिवाज व नवप्रयोग याचा अंदाज आला तर आपल्याला समज आहे असे समजावे. मराठीच्या कक्षा रुंदावताना गावपातळीवरील शब्द समजत नसतील तर आपण नव्या महाराष्ट्र धर्माला जागत नाही. महाराष्ट्राची लोकपरंपरा सहिष्णु असली तरी दस्तावेजीकरण करण्यात मागे आहे. अकर्मण्याच्या गोष्टींचे दस्तावेजीकरण करणे, हा नवमहाराष्ट्र धर्म आहे.
डॉ. अनिरुद्ध मोरे म्हणाले, मराठी भाषा, धर्म, जाती, पंथ यांना एकत्र घेऊन नांदते आहे. अडीच हजार वर्षांपेक्षा जास्त परंपरा लाभलेल्या मराठी माषेची महती अभिजात दर्र्जा मिळाल्याने सिद्ध झाली आहे. भाषेला जेव्हा राजाश्रय मिळतो तेव्हा ती चांगल्या प्रकारे विकसित होते. धर्म म्हणजे धारणा-कर्तव्य होय. धर्माची व्याख्या जेव्हा सामान्य जनांपर्यंत पोहोचेनाशी झाली तेव्हा समाजाला या गर्तेतून बाहेर काढण्यासाठी संतांनी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले. मराठी भाषेची अस्मिता संत परंपरेने जिवंत राहिली आहे.
अरुणा देशपांडे म्हणाल्या, आपल्या मातृभाषेचा सार्थ अभिमान असणे अत्यंत आवश्यक आहे. मराठी भाषा व महाराष्ट्र धर्म टिकविण्यासाठी आम्ही महाराष्ट्राच्या बाहेर स्थायिक असलो तरी कृतिशील राहून त्यांचे संवर्धन करण्याचा प्रयत्न करीत आहोत.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना श्रीराम पवार म्हणाले, महाराष्ट्र धर्म विवेकाची मांडणी करणारा आहे. समतेचा विचार बाजूला पडला होता. तेव्हा संत वाङ्मयाच्या माध्यमातून वारकरी संप्रदायाने तो पुढे आणला. महाराष्ट्रातील माणसाने नेतृत्व करावे, राज्य करावे हे स्वप्न उराशी बाळगणे आवश्यक आहे. प्रबोधन चळवळ, वैचारिक क्रांती, लोकपरंपरा, लोकसाहित्य आणि लोकसंस्कृतीतून महाराष्ट्र धर्माचे पालन केले गेले. मराठी ही संस्कृत भाषेच्या पोटातून आलेली नसून ती स्वतंत्र भाषा आहे. आपली पाळे-मुळे न सोडता महाराष्ट्र धर्म उत्क्रांत होत गेला आहे. सर्व समावेशकता आणि सहिष्णुता यांच्या माध्यमातून जिंकणे हा धागा म्हणजे महाराष्ट्र धर्म होय.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निरजा आपटे यांनी केले. वक्त्यांचा सन्मान श्रीराम पवार यांनी केला.
भाषा हा माणसाने लावलेला शोध
Date:

