‘माझा मऱ्हाटाचि बोलु कवतिकें’ विशेष सांगीतिक कार्यक्रम
पुणे : मराठी भाषा वृद्धिंगत करण्यासाठी योगदान देणाऱ्या साहित्यिक, कलावंत, रंगकर्मी यांचा मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने संवाद, पुणे, कोहिनूर ग्रुप आणि महक यांच्या वतीने विशेष सत्कार करण्यात येणार आहे. सत्कार सोहळ्याच्या निमित्ताने ‘माझा मऱ्हाटाचि बोलु कवतिकें’ या गीत, संगीतावर आधारित सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रम गुरुवार, दि. 27 फेब्रुवारी 2025 रोजी सायंकाळी 5:30 वाजता बालगंधर्व रंगमंदिर येथे आयोजित करण्यात आला आहे. बकुल पंडित (नाट्यसंगीत), डॉ. प्रकाश खांडगे (लोकसाहित्य), शाहीर हेमंत मावळे (पोवाडा), राजाभाऊ चोपदार (श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचे वंशपरंपरागत पालखीचे चोपदार, वारकरी), त्यागराज खाडिलकर (कीर्तन), रघुनाथ खंडाळकर (अभंगवाणी), मनिषा निश्चल (भावगीत) यांचा गौरव ज्येष्ठ रंगकर्मी, जनस्थान पुरस्काराचे मानकरी प्रा. सतीश आळेकर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. कोहिनूर ग्रुपचे संस्थापक कृष्णकुमार गोयल, महाराष्ट्र आर्थिक विकास महामंडळाचे उपाध्यक्ष सचिन ईटकर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे, अशी माहिती संवाद, पुणेचे सुनील महाजन, निकिता मोघे यांनी निवेदनाद्वारे कळविली आहे. केतकी महाजन-बोरकर कार्यक्रमाच्या संयोजक आहेत.
‘माझा मऱ्हाटाचि बोलु कवतिके’ या कार्यक्रमात बकुल पंडित, शाहीर हेमंत मावळे, राजाभाऊ चोपदार, त्यागराज खाडिलकर, रघुनाथ खंडाळकर, मनिषा निश्चल यांचा सहभाग असणार आहे. झंकार कानडे, सागर टेमघरे (की-बोर्ड), हनुमंत रावडे (ढोलक, पखवाज), संतोष पेडणेकर (तालवाद्य), विजय तांबे (बासरी), अमेय ठाकुरदेसाई (तबला), सिद्धार्थ कदम (ऑक्टोपॅड) साथसंगत करणार आहेत.
कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.

