पुणे-महाराष्ट्राच्या जनतेला धन्यवाद करण्यासाठी मी आज पुण्यात आलो असल्याचे केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांनी म्हटले आहे. विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेने महायुतीला आशीर्वाद दिला. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वातील सरकार येथे स्थापन केले आहे. महायुतीला ऐतिहासिक बहुमत तर महाराष्ट्राच्या जनतेने दिलेच आहे मात्र, त्याच बरोबर कोणती शिवसेना असली आणि कोणती शिवसेना नकली तसेच कोणती एनसीपी असली आणि कोणती नकली, याचा निर्णय देखील महाराष्ट्रातील जनतेने केला असल्याचा दावा अमित शहा यांनी केला आहे.
दिल्लीमध्ये होणाऱ्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या निमित्ताने कालच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार हे एकाच व्यासपीठावर आले होते. यावेळी या दोन्ही नेत्यांमध्ये असलेली जवळीक सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. मात्र, आज अमित शहा यांनी पुन्हा एकदा शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. खरी एनसीपी कोणाची हे आता महाराष्ट्राच्या जनतेने दाखवून दिले असल्याचे अमित शहा यांनी म्हटले आहे. पुण्यात केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शहा यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ‘प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) टप्पा 2 अंतर्गत लाभार्थींना मंजूरी पत्र व पहिल्या हप्त्याच्या वितरण कार्यक्रमा’त ते बोलत होते.
या वेळी अमित शहा म्हणाले की, 20 लाख कुटुंबीयांना घर देताना त्या सर्व कुटुंबीयांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या वतीने मी अभिवादन तसेच अभिनंदन करतो. देशाच्या प्रगतीत विकासाचा पाया रचत असताना या सर्व कुटुंबांनी कामाला लागण्याचा संकल्प शहा यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्रातील जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवले आहे. पंतप्रधान झाल्यानंतर पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत मोदीजींनी प्रधानमंत्री आवास योजनेच्या टप्प्या दोनची सुरुवात केली आहे. देशभरात सर्वात जास्त घरे ही महाराष्ट्राला मिळाली असल्याचा दावा अमित शहा यांनी केला आहे. याचा आम्हाला सर्वांना आनंद आणि गौरव असायला हवा, असे देखील ते म्हणाले. घराचा अर्थ केवळ चार भिंती नाही तर विकासाच्या स्वप्नाला साकार करणे असल्याचे त्यांनी म्हटले आहे. प्रत्येकाचे घर हे स्वर्गा सारखे तर असतेच मात्र येणाऱ्या पिढीसाठी हा विकासाचा प्रथम टप्पा देखील असतो. गरिबांना घरासोबतच शौचालय देणे म्हणजे त्यांच्या सन्मानाची आणि स्वाभिमानीची रक्षा मोदीजींनी केली असल्याचे शहा यांनी म्हटले आहे.
प्रत्येकाला घर या योजनेअंतर्गत महिला, मागासवर्गीय, एसटी, एससी, गरीब समाजाला स्वतःचे घर देण्याचा कार्यक्रम तयार करण्यात आला. 2029 पर्यंत यात पाच कोटी घरे दिली जाणार आहेत. त्यातील तीन कोटी 50 लाख नागरिकांना आतापर्यंत घरे देण्यात आली आहेत. तर महाराष्ट्रात देखील आतापर्यंत तेरा लाख पन्नास हजार घरे देण्यात आली आहेत. आता 19 लाख 50 हजार घरे देण्यात येत आहेत. ही सर्व घरे वेळेत पूर्ण करण्याचे काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निश्चित केले असल्याचे म्हणत अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्याचे देखील कौतुक केले.