मालवण- तारकर्ली बीचवर पुण्यातील दोन पर्यटकांचा बुडून मृत्यू झाला आहे. तर एका पर्यटकाला वाचविण्यात स्थानिकांना यश आले आहे. मालवणला अनेक पर्यटक पर्यटनासाठी येत असतात. इथं येणाऱ्या पर्यटकाना मालवणचा समुद्र नेहमीच खुणावत असतो. त्यामुळे समुद्रात जाण्यापासून पर्यटक स्वत:ला रोखू शकत नाहीत. त्यामुळे अनेक वेळी पर्यटक बुडाल्याच्या घटना घडल्या आहेत.मिळालेल्या माहितीनुसार पुण्यातील 5 जण फिरण्यासाठी मालवणला गेले होते. यावेळी पोहण्याचा मोह झाल्याने 5 पर्यटक समुद्रात उतरले. यातील तिघे खोल समुद्रात गेले. यावेळी बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. शुभम सोनवणे, रोहित कोळी यांचा मृत्यू झाला असून ते दोघेही पुण्यातील हडपसर येथील रहिवासी होते. तर ओंकार भोसलेची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पुण्यातील 5 मित्र हे फिरण्यासाठी मालवणमध्ये गेले होते. यावेळी त्यांना पोहण्याचा मोह आवरला नाही आणि ते तारकर्ली बीचवर गेले. अंघोळीसाठी म्हणून समुद्रात उतरलेल्या मित्रांना स्थानिक नागरिकांनी खोल समुद्रात जाऊ नका असे सांगितले. 5 मित्रांपैकी दोघांनी स्थानिकांचे म्हणणे ऐकले. मात्र, तिघांनी स्थानिकांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत खोल समुद्रात जाण्याचा निर्णय घेतला. तिघांनी बुडतांना पाहताच स्थानिकांनी वाचविण्यासाठी धाव घेतली पण तो पर्यंत दोघांचा बुडून मृत्यू झाला तर एका जणांला वाचविण्यात त्यांना यश आले. गंभीर असलेल्या भोसलेवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून दोघांचे मृतदेह स्थानिकांनी पाण्याबाहेर काढले. या दोघांचे मृतदेह स्थानिकांनी बाहेर काढत ग्रामीण रुग्णालयात नेले आहेत. या समुद्र किनार्यावर वारंवार अशा दुर्घटना घडत असतात. मात्र प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याने स्थानिक नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.उन्हाळ्याच्या सुट्टीत अनेक जण कोकणमध्ये फिरायला येत असतात. त्यात मालवण म्हणजे सर्वांसाठी परवणीच आहे.समुद्री खेळासाठी इथे महाराष्ट्रभरातील लोकांची गर्दी होत असते. स्कुबा डायव्हिंगचे प्रमुख आकर्षण असलेल्या मालवणला गेल्या काही काळापासून तारकर्लीला पर्यटकांची पहिली पसंती मिळत आहे.

