पुणेः मुलांमधल्या मूळ, आपसूक गुणांना न्याय देऊन त्याद्वारे त्यांचे व्यक्तिमत्त्व विकसित करणे हे राष्ट्रीय शिक्षण धोरणाचे अत्यंत महत्त्वाचे उद्दिष्ट असल्याचे प्रतिपादन राज्य शालेय शिक्षण मंत्री डॉ. पंकज भोयर यांनी केले. डेक्कन एज्युकेशन सोसायटी आणि विद्या भारती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या पुणे शिक्षण परिषदेचे उद्घाटन भोयर यांच्या हस्ते करण्यात आले.
समाजाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी अत्यंत कळीचे असलेल्या शिक्षण क्षेत्रांत येत्या काही वर्षांत अमुलाग्र बदल होणार आहेत. या सकारात्मक बदलांसाठी समाजाची तयारी करणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय शिक्षण धोरणातील राज्य अभ्यासक्रम आराखड्याची सर्वांगीण चर्चा करण्यासाठी आयोजित केलेल्या या परिषदेचे अत्यंत महत्त्व असल्याचे भोयर यांनी यावेळी अधोरेखित केले.
राज्य सरकारच्या आगामी शैक्षणिक धोरणासंदर्भातील दिशेचे संकेतही भोयर यांनी यावेळी दिले. पूर्वप्राथमिक शाळांसंदर्भातील निश्चित धोरणासहच मुलांमधील विशेष गुणांवर आधारित अभ्यासक्रम राबविणाऱ्या आठ निवासी गुरुकुलांसंदर्भातील योजनेचा उल्लेख त्यांनी यावेळी केला.
या परिषदेच्या संयोजनातील प्रमुख घटक असलेल्या विद्या भारती संस्थेचे महाराष्ट्र प्रांत संचालक अरुण कुलकर्णी यांनीही यावेळी परिषदेस संबोधित केले. प्रस्तुत राष्ट्रीय शिक्षण धोरणाची सांगड भारतीयीकरणाच्या प्रक्रियेशी घालण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन कुलकर्णी यांनी यावेळी केले. त्याचबरोबर, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासाची मूलभूत उद्दिष्टे हा राष्ट्रीय शिक्षण धोरण व विद्या भारतीमधील समान धागा असल्याचे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.
डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष प्रमोद रावत, सचिव डॉ. आनंद काटीकर यांच्यासहित
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पश्चिम प्रांत संघचालक नानासाहेब जाधव हे या कार्यक्रमास उपस्थित होते. डॉ. श्रीपाद ढेकणे यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
विद्या भारती पुणे शाखेचे अध्यक्ष रघुनाथ देविकर यांनी या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले.