पुणे : मराठी राजभाषा दिन आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून ‘सावरकर ते शिरवाडकर’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मराठी भाषेला वैभव प्राप्त करून देणाऱ्या अनमोल रत्नांचा माहिती व तंत्रज्ञान, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते या प्रसंगी सन्मान केला जाणार आहे.
पुणे पुस्तक महोत्सव आयोजित आणि संवाद, पुणेची निर्मित गीत-संगीत, अभिवाचन, कविता, पोवाडा यांचा समावेश असलेला कार्यक्रम बुधवार, दि. 26 फेब्रुवारी 2025 रोजी सायंकाळी 5:30 वाजता बालगंधर्व रंगमंदिर येथे आयोजित करण्यात आला आहे. या प्रसंगी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे, अशी माहिती पुणे पुस्तक महोत्सवाचे मुख्य संयोजक राजेश पांडे आणि संवाद, पुणेचे सुनील महाजन यांनी निवेदनाद्वारे कळविली आहे.
कार्यक्रमाची संकल्पना संवाद, पुणेचे सुनील महाजन यांची असून सूत्रधार निकिता मोघे आहेत. संहिता लेखन आणि निवेदन अक्षय वाटवे यांचे असून चैत्राली अभ्यंकर, संजीव मेहेंदळे, सुजित सोमण गीते सादर करणार आहेत. केदार परांजपे (की-बोर्ड), दिप्ती कुलकर्णी (संवादिनी), राजू जावळकर (तबला), उद्धव कुंभार (ताल वाद्य) साथसंगत करणार आहेत.
मराठी भाषेला वैभव प्राप्त करून देणारे ज्येष्ठ कवी, लेखक फ. मुं. शिंदे, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, डॉ. श्रीपाल सबनीस, लक्ष्मीकांत देशमुख, भारत सासणे, डॉ. रवींद्र शोभणे यांचा माहिती व तंत्रज्ञान, सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते गौरव केला जाणार आहे.
कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.