पुणे, ता. २१: “पुणे शहर वेगाने विकसित होण्यासह सर्वच दिशांनी विस्तारत आहे. त्यामुळे नगरनियोजनासोबत शहरातील बांधकामांचे, सार्वजनिक तसेच खासगी आस्थापनांचे डिझाईन अतिशय महत्त्वाचे आहे. शहर नियोजन आणि डिझाईन या संदर्भातील प्रयत्नांना राज्य सरकार पाठिंबा देईल,” असे प्रतिपादन राज्याच्या नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी केले.

आर्किटेक्चर, एन्व्हायर्नमेंट, इंटेरियर डिझाईन, टाऊन प्लॅनिंग व अर्बन डिझाईन क्षेत्रात कार्यरत पुण्यातील व्हीके ग्रुपच्या वतीने ५१ व्या वर्षपूर्तीनिमित्त आयोजित ‘व्हीकलेक्टिव्ह-बिल्डिंग द सिटी वि कॉल होम’ या तीन दिवसीय प्रदर्शनाचे उद्घाटन माधुरी मिसाळ यांच्या हस्ते झाले. घोले रस्त्यावरील पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक केंद्रात झालेल्या कार्यक्रमात आमदार सिद्धार्थ शिरोळे, व्हीके ग्रुपचे संस्थापक विश्वास कुलकर्णी, व्यवस्थापकीय संचालक ऋषिकेश कुलकर्णी, अनघा परांजपे-पुरोहित, अपूर्वा कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.
उद्घाटनप्रसंगी मगरपट्टा सिटी कॉर्पोरेशनचे प्रतीक मगर, डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष प्रमोद रावत, पीएनजी ज्वेलर्सचे व्यवस्थापकीय संचालक सौरभ गाडगीळ, सवाई गंधर्व महोत्सवाचे संचालक मुकुंद संगोराम व केपीआयटी कमिन्सचे रवी पंडित यांना ‘लीडर्स ऑफ चेंज’ने सन्मानित करण्यात आले. राजा रवी वर्मा आर्ट गॅलरीत व्हीके ग्रुपने गेल्या ५० वर्षांत साकारलेल्या आकर्षक, नाविन्यपूर्ण व वास्तुकलेच्या डिझाईन्स व प्रकल्पाच्या संग्रहाचे प्रदर्शन पाहण्याची संधी पुणेकरांना यानिमित्ताने मिळणार आहे.
माधुरी मिसाळ म्हणाल्या, “पुण्याची परंपरा मोठी आणि अभिमानास्पद आहे. मात्र, आधुनिक काळात पुणे शहराचे नव्याने नियोजन करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी डिझाईनचे महत्त्व आहे. सर्व दिशांनी सतत वेगाने विस्तारणारे आपले शहर वाहतुकीच्या समस्येनेही ग्रासले आहे. शहराचा विस्तार होताना बांधकाम, नियोजन आणि डिझाईन, यांचा विचार प्राधान्याने झाला पाहिजे. शहराचे काही क्लस्टर विभाजन करणे आवश्यक आहे. त्यातून शहराचे सौंदर्य टिकून राहण्यास साह्य मिळेल, असा मार्ग आर्किटेक्ट असोसिएशन आणि अन्य घटकांनी मिळून काढला पाहिजे.”
“व्हीके ग्रुपच्या माध्यमातून गेली ५० वर्षे सातत्याने पुण्यासह इतरत्रही उत्तम दर्जाच्या इमारती, आरेखन, पर्यावरणपूरक बांधकामे असे कार्य सातत्याने सुरू आहे. सलग पाच दशके असे योगदान देणे, ही महत्त्वाची बाब असून, त्यासाठी व्हीके ग्रुप अभिनंदनास पात्र आहे. आज इथे सन्मानित विविध क्षेत्रातील मान्यवर पुणेकरांचे ‘कलेक्शन’ सादर केले आहे. पुण्याच्या सर्वांगीण विकासात त्यांचे योगदान मोलाचे राहिले आहे,” अशा शब्दात माधुरी मिसाळ यांनी कौतुक केले.
‘पुणे हे सर्व क्षेत्रांत अतुलनीय भरारी घेणाऱ्या प्रतिभावंतांचे शहर आहे. पुणेकरांनीच शहर आणि शहराचे कर्तृत्व वाढवले व उंचावले आहे,’ असे मुकुंद संगोराम यांनी, तर ‘सध्या नियोजन बाजूला ठेवून अफाट एफएसआय दिला जात असल्याने शहराचे मूळ सौंदर्य आणि आटोपशीरपणा नष्ट झाला असून, शहराची चुकीच्या पद्धतीने होणारी वाढ थांबवण्याबाबत विचार करावा, असे प्रमोद रावत यांनी नमूद केले. अपूर्वा कुलकर्णी यांनी मानपत्रांचे वाचन केले. विजय साने यांनी प्रास्ताविक केले. मीनल पाटील यांनी सूत्रसंचालन केले
भविष्यातील शहरांवर चर्चा
‘बिल्डिंग द सिटी ऑफ टुमारो’ या विषयावरील चर्चासत्र कार्यक्रमाच्या उत्तरार्धात झाले. त्यामध्ये ‘क्रेडाई’चे अध्यक्ष रणजित नाईकनवरे, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्ट्सच्या पुणे चॅप्टरचे चेअरमन विकास अचलकर, पर्सिस्टंट सिस्टीम्सचे मुख्य प्रशासकीय अधिकारी जयंत कोंडे, एमसीसीआयएच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य विवेक साधले, ब्रिक्सच्या संस्थापिका पूजा मिसाळ, व्हीके ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक आर्कि. हृषीकेश कुलकर्णी सहभागी झाले होते.