नवी दिल्ली – अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा उद्घाटन सोहळा राजधानी दिल्ली येथे पार पडला. या कार्यक्रमाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्वागताध्यक्ष म्हणून शरद पवार उपस्थित होते. यावेळी शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींचे कौतुकही केले आहे.
शरद पवार म्हणाले, मराठी माणूस केवळ महाराष्ट्रात नव्हे तर आपल्या महाराष्ट्राचा झेंडा अटकेपार फडकावला आहे. दिल्ली मध्ये दिसतो, हरियाणामध्ये दिसतो, गुजरातमध्ये दिसतो. देशाच्या कानाकोपऱ्यात मराठी माणूस दिसून येतो. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन राजधानीत दुसऱ्यांदा होत आहे. यावेळी देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आले याचा मला फार आनंद झाला आहे. महाराष्ट्र शासन, महाराष्ट्राचे रसिक, साहित्यिक या सर्वांनी पाठपुरावा केला आणि मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा पंतप्रधान मोदींनी मिळवून दिले.
पुढे बालताना शरद पवार म्हणाले, 1954 साली पहिल्यांदा दिल्लीला मराठी साहित्य संमेलन झाले. त्यावेळी देशाचे प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरू होते. त्यांनी याचे उद्घाटन केले होते. मी जेव्हा याचे निमंत्रण देण्यासाठी गेलो तेव्हा मोदींनी एक मिनिट सुद्धा लावला नाही आणि महाराष्ट्राचा हा कार्यक्रम आहे तर माझी उपस्थिती असणार आहे असे त्यांनी सांगून टाकले. इतकी संमेलने झाली, मात्र केवळ चार महिलांनाच संमेलनाचे अध्यक्षपद मिळाले. तारा भवाळकर यांना संमेलनाचे अध्यक्षपद मिळाले हे आनंददायी आहे. दिल्ली आणि महाराष्ट्राचे एक नाते आहे. महाराष्ट्र आणि दिल्लीचे राजकीय आणि सांस्कृतिक संबंध आहेत, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.
दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की, साहित्य क्षेत्रात अनेक भगिनींनी भर घातली आहे. साहित्य संमेलन म्हटले की राजकारण्यांचा इथे काय संबंध अशी चर्चा सुरू होते. राजकारण आणि साहित्य यांच्यातील संबंध जवळचा आहे. सध्या संवाद कठीण आणि नाजूक परिस्थितीमधून जात आहे. त्यामुळे आता साहित्यिकांची जबाबदारी वाढली आहे. संमेलनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित आहेत, त्यासाठी मी त्यांचे आभार मानतो, असेही शरद पवार यावेळी म्हणाले.

