- केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले घेणार पीडित कुटुंबियांची भेट
पुणे : भोर येथील बौद्ध युवक विक्रम गायकवाड यांच्या आंतरजातीय विवाहतून झालेल्या हत्ये नंतर आंबेडकरी चळवळीमध्ये मोठा रोष निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर दिनांक 18 फेब्रुवारी रोजी भोर तहसील कार्यालयावर जवळपास हजारो लोकांच्या उपस्थितीत निषेध मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चाद्वारे पोलीस अधीक्षक यांना सादर केलेल्या निवेदनाच्या अनुषंगाने आज पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांची परशुराम वाडेकर, डॉ. सिद्धार्थ धेंडे, राहुल डंबाळे यांचे सह प्रवीण ओव्हाळ, बाळासाहेब अडसूळ, नवनाथ गायकवाड इत्यादींच्या प्रतिनिधी मंडळांनी भेट घेतली असता सदर प्रकरणी राज्य सरकार व जिल्हा पोलीस प्रशासन गंभीर असून आंदोलकांच्या मागणीच्या नुसार या प्रकरणी आठ अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश असलेले विशेष तपास पथक अर्थात एसआयटीची स्थापना करण्यात आल्याची माहिती शिष्टमंडळाला पोलिस आधीक्षकांनी दिली. या प्रकरणात फिर्यादी व साक्षीदार यांच्यावर कोणताही दबाव येऊ नये व त्यांना कोणतीही भीतीचे वातावरण वाटू नये यासाठी ॲट्रॉसिटी कायद्यातील तरतुदीनुसार फिर्यादीला व त्यांच्या कुटुंबीयांना 24 तास पोलीस संरक्षण पुरवण्याचे आदेश काढण्यात आल्याचे पंकज देशमुख यांनी सांगितले. तसेच आजच जिल्हा समाज कल्याण कार्यालयाकडून सुमारे चार लाख 25 हजार रुपयांचा सहायता निधी पीडित मातेच्या नावावर वर्ग करण्यात आलेला आहे. केवळ पुनर्वसन नव्हे तर आरोपींना जास्तीत जास्त शिक्षा होणे आवश्यक आहे तसेच अशा प्रकारच्या कोणत्याही घटना होऊ नये यासाठी राज्य सरकारने विशेष प्रयत्न करावेत अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन करण्यात येणार असल्याचे रिपब्लिकन पक्षाचे नेते परशुराम वाडेकर यांनी सांगितले यावेळी ते बोलताना म्हणाले की 22 फेब्रुवारी रोजी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले हे देखील पीडित कुटुंबीयांची भेट घेणार असून ते याप्रकरणी योग्य तो न्याय मिळावा म्हणून मुख्यमंत्री व पोलीस महासंचालक यांच्याशी देखील बोलणार आहेत.
अशा प्रकारच्या घटना समोर आल्यानंतर कार्यकर्त्यांनी अत्यंत जबाबदारीने प्रकरणाला सामोरे जायला हवे व यातील आरोपींना शिक्षा होण्यासाठी प्राथमिक तपास योग्य करण्यासाठी पोलिसांच्या सोबत काम केले पाहिजे अशी भूमिका डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी मांडली.
दरम्यान, अलीकडच्या काळात वाढत असलेल्या ऑनर किलिंग च्या घटनांमुळे तरुणांमध्ये मोठी भीती व संतापाची भावना असून सरकारने ऑनर किलिंग विरोधी कायदा तात्काळ करावा अशी मागणी राहुल डंबाळे यांनी केली.