; सॉफ्टटेक ग्लोबल आणि अँप्लिनेक्स्टच्या वतीने एआय-पावर्ड एईसीओ इनोव्हेशन चॅलेंज स्पर्धेचे आयोजन
पुणे: कृत्रिम बुद्धिमत्ता ही मानवी बुद्धिमत्तेपेक्षा मोठी नाही, परंतु योग्य वापर केल्यास ती मोठे बदल घडवू शकते. भविष्यात बांधकाम क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवण्यासाठी नाविन्यपूर्ण कल्पना आणि स्टार्टअप्सची नितांत आवश्यकता आहे, असे प्रतिपादन आयआयटी मुंबईचे प्रा. वेंकट कुमार यांनी केले.
सॉफ्टटेक ग्लोबल आणि अँप्लिनेक्स्ट यांच्या वतीने आयोजित एआय-पावर्ड एईसीओ इनोव्हेशन चॅलेंज २०२५ या स्पर्धेत देशभरातील एआय स्टार्टअप्सनी सहभाग घेतला. बालेवाडी येथील द ऑर्चिड हॉटेल मध्ये पार पडलेल्या या स्पर्धेत स्टार्टअप्सनी एआय तंत्रज्ञानाच्या माध्यमातून एईसीओ म्हणजेच आर्किटेक्चर, इंजिनिअरिंग, कंस्ट्रक्शन आणि ऑपरेशन्स क्षेत्रासाठी विकसित केलेल्या नाविन्यपूर्ण उपायांची प्रस्तुती केली.
कार्यक्रमाला नॅसकॉमचे एआय प्रोग्राम डायरेक्टर माधव बिस्सा, सॉफ्ट टेक ग्लोबलचे संस्थापक विजय गुप्ता, ऑटोडेस्क एपीएसीचे संचालक निखिल बागलकोटकर आणि अँप्लिनेक्स्ट एईसीओ इनक्यूबेटरच्या सीईओ वर्षाराणी भगतपाटील उपस्थित होते.
माधव बिस्सा म्हणाले, स्पर्धेचे आयोजन एईसीओ क्षेत्राच्या सध्याच्या गरजेची पूर्तता करणारे आहे. अम्प्लिनेक्स्टने एक ओपन-इनोव्हेशन इकोसिस्टम कनेक्ट इव्हेंट यशस्वीरित्या आयोजित केला. यात सहभागी स्टार्टअप्स त्यांच्या एआय आधारित नाविन्यपूर्ण उपायांद्वारे बांधकाम क्षेत्राच्या डिजिटल परिवर्तन प्रवासात महत्वपूर्ण योगदान देतील.
विजय गुप्ता म्हणाले, तंत्रज्ञानात मोठे सामर्थ्य आहे, परंतु त्याचा परिणाम त्याच्या उपयोगावर अवलंबून असतो. दुर्दैवाने, ऑटो आणि बांधकाम क्षेत्र तंत्रज्ञानाच्या संधींचा अद्याप पुरेपूर लाभ घेत नाही. त्यामुळे, या क्षेत्रातील एआय स्टार्टअप्ससाठी मोठ्या संधी उपलब्ध आहेत.
निखिल बागलकोटकर म्हणाले, डिजिटल परिवर्तनामुळे उत्पादकतेत मोठी वाढ झाली आहे. जे उद्योग डिजिटल तंत्रज्ञानाचा स्वीकार करतात, ते अधिक व्यावसायिक यश मिळवतात. आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा प्रभाव जागतिक स्तरावर विविध स्वरूपात जाणवतो, परंतु त्याचा स्वीकार करणाऱ्या कंपन्यांना त्याचा मोठा फायदा होतो.
या स्पर्धेत योको स्टाईल्सचे संस्थापक कासी विश्वनाथन यांनी प्रथम क्रमांक पटकावित १.५ लाखाचे पारितोषिक पटकाविले. विस्नेट एआय चे संस्थापक साई कृष्णा आणि लाॅजिक लेन्सचे संस्थापक अजय सतपथी यांनी द्वितीय क्रमांक पटकाविला तर ओथोर एआय चे संस्थापक उन्नी कोरोथ आणि नेकेंद्र शेखावत, डेटारिन्यू चे संस्थापक तन्मय चक्रवर्ती यांनी तृतीय क्रमांक पटकाविला.
वर्षाराणी भगत पाटील म्हणाल्या, अँप्लिनेक्स्ट नव्याने उदयोन्मुख होणाऱ्या स्टार्टअप्सना तांत्रिक सहाय्य, वित्तपुरवठा आणि बाजारपेठेत प्रवेश मिळवून देण्यासाठी मदत करत आहे. एआय आणि नवीन तंत्रज्ञानाच्या मदतीने, स्टार्टअप्ससाठी धोरणात्मक भागीदारी उपलब्ध करून दिली जाते. या स्पर्धेमुळे नवउद्योजकांना त्यांची उत्पादने व्यावसायिकरित्या विकसित करण्यासाठी योग्य मार्गदर्शन मिळाले.