पुणे-महात्मा फुले चौक, मुंढवा येथे उड्डाणपूल उभारण्यासाठी महापालिकेच्या अर्थसंकल्पात पूर्णतः तरतूद करावी अशी मागणी शिवसेनेचे शहर प्रमुख संजय मोरे,तसेच समीर तुपे,दिलीप व्यवहारे,गिरीष गायकवाड यांनी केली आहे.
महात्मा फुले चौक, मुंढवा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सतत वाहतूक कोंडी होत असते. यामुळे वारंवार अपघात होउन शेकडो लोक जखमी झाले, आणि अनेक लोक मुत्युमुखी पडले आहेत. तसेच सदर महात्मा फुले चौक, मुंढवा येथून १०० मी अंतरावर लोणकर माध्यमिक विद्यालय व १५० मी अंतरावर राजर्षी शाहू महाराज विद्यालय आहे. शाळा भरण्याच्या व सुटण्याच्या वेळेला तेथील विद्यार्थ्यांना महात्मा फुले चौक पार करण्यासाठी जीव मुठीत धरून रस्ता पार करावा लागतो. पालकही मुले घरी येईपर्यंत तणावाखाली असतात. त्याचप्रमाणे केशवनगर मधील रहिवाशी किंवा खराडी येथील रहिवासी यांची अडचण तसेच नगर रोडवरील वाहतूक सोलापूर रोडकडे जाण्यासाठी याच चौकामधून जात असल्याने येथे मोठी वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. त्यांना अर्धा तास महात्मा फुले चौकातील सिग्नलला थांबणे अनिवार्य आहे.यासर्व समस्यांवर उपाय म्हणजे याठिकाणी वाहनांसाठी उड्डाणपूल होणे आवश्यक आहे. तसेच पादचाऱ्यांसाठी व्यवस्थित रित्या मार्गक्रमण होण्यास तशी सोय यामधे उपलब्ध असणे अतिशय गरजेचे आहे. महापालिकेच्या सन 2025 -26 च्या अंदाजपत्रकामधे जनतेच्या आग्रहास्तव तरतूद करण्यात यावी. अशी मागणी करीत आहोत. वारंवार होणाऱ्या वाहतूक कोंडीतून पुणे महानगरपालिकेला वेळेवर मिळकतकर भरणार्या नागरिकांची सुटका करावी हि विनंती. अन्यथा वर्षानुवर्ष त्रास सहन करणाऱ्या सर्वसामान्य जनतेच्या सुरक्षेसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाला तीव्र आंदोलन करण्याशिवाय पर्याय नसेल याची नोंद घ्यावी.