२३ फेब्रुवारी रोजी गांधी भवन येथे पुरस्कार वितरण सोहळा
पुणे:बाबा आमटे एकता अभियान ट्रस्टतर्फे दिला जाणारा ‘बाबा आमटे जीवनगौरव राष्ट्रीय पुरस्कार २०२५’ ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि युवक क्रांती दलाचे संस्थापक डॉ. कुमार सप्तर्षी यांना जाहीर झाला असल्याची माहिती ट्रस्टचे सचिव डॉ.अशोक बेलखोडे, समन्वयक डॉ.सोमनाथ रोडे यांनी पत्रकाद्वारे दिली.हा पुरस्कार वितरण सोहळा रविवार,दि.२३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ४ वाजता गांधी भवन (कोथरूड, पुणे) येथे होणार आहे.
जेष्ठ स्वातंत्र्यसैनिक जी.जी.पारीख आणि जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सुहिता थत्ते, रुकय्या जोशी यांच्या हस्ते ज्येष्ठ लेखक डॉ.अच्युत गोडबोले यांच्या उपस्थितीत पुरस्कार वितरण होणार आहे. महारोगी सेवा समिती, आनंद वन चे अध्यक्ष डॉ विकास आमटे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील.
याच कार्यक्रमात ‘बाबा आमटे सामाजिक कार्यकर्ता राष्ट्रीय पुरस्कार’ देवून ओरिसा येथील सामाजिक कार्यकर्ते मधुसूदन दास आणि कोल्हापूर येथील हसन फत्तेखान देसाई यांना संयुक्तपणे गौरविण्यात येणार आहे. देसाई हे बाबा आमटे यांच्या दोन्ही भारत जोडो सायकल अभियानातील सायकल यात्री आहेत.
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते,विचारवंत, युवक क्रांती दलाचे संस्थापक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डॉ. सप्तर्षी यांनी अनेक दशके महात्मा गांधी यांच्या विचारांनी प्रेरित होऊन कार्य केले आहे. ते ‘महाराष्ट्र गांधी स्मारक निधी’ या संस्थेचे अध्यक्ष असून ‘सत्याग्रही विचारधारा’ या मासिकाचे ते संपादक आहेत. तसेच दास हे प्रसिद्ध गांधीवादी ‘एस. एन. सुब्बाराव’ यांच्या पासून प्रेरित ‘राष्ट्रीय युवा योजना’ या संघटनेचे संचालक आहेत तर देसाई हे राष्ट्र सेवा दलाचे सक्रिय कार्यकर्ते आणि समाजसेवक आहेत.