बीव्हीजी परिवार हळहळला
पुणे (प्रतिनिधी) : बीव्हीजी इंडियाचे चेअरमन हणमंतराव गायकवाड व त्यांना साथ देणारे बंधु डॉ. दत्तात्रेय गाकवाड यांच्या मातोश्री सिताबाई रामदास गायकवाड (वय ७०) यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या निधनाने गायकवाड परिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. उद्या दि. २१ रोजी सकाळी ८:३० वा. पिंपळे गुरव स्मशान भुमी येथे त्यांचा तिसरा विधी संपन्न होणार आहे.
गायकवाड परिवारासाठी मोठा धक्का
सिताबाई गायकवाड यांचे निधन हे गायकवाड परिवारासाठी मोठा भावनिक धक्का आहे. पुणे महानगर पालिकेच्या शिक्षण मंडाळामध्ये सिताबाईंनी प्राथमिक शिक्षिका म्हणून सेवा बजावली होती. पती रामदास यांच्या निधनानंतर अत्यंत हलाकीच्या परिस्थितीमध्ये त्यांनी मोठा मुलगा हणमंतराव यांना अभियांत्रिकी विभागाचे शिक्षण दिले. धाकटा मुलगा दत्तात्रेय यांना डॉक्टर बनवले होते. आईच्या मार्गदर्शनामुळे भारत विकास गृप (बीव्हीजी) हा १ लाख नागरिकांना रोजगार देण्यात यशस्वी ठरल्याचे हणमंतराव गायकवाड नेहमी त्यांच्या भाषणाद्वारे सांगत असतात. आईच्या निधनानंतर बीव्हीजी परिवाराने हळहळ व्यक्त केली आहे.
सांप्रदायिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य
सेवा निवृत्तीनंतर पिंपळे गुरव परिसरात सिताबाई या सांप्रदायिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत होत्या. महिला भजन मंडळाच्या माध्यमातून त्यांनी सुधारणावादी उपक्रम राबवले. सांगवी परिसरातील बहुसंख्य नागरिकांना अयोध्येतील प्रभू श्री राम मंदीराचे दर्शन स्व:खर्चाने घडवले होते.
विविध क्षेत्रातून श्रद्धांजली
देश विदेशातील उद्योग, आरोग्य, शिक्षण क्षेत्रातील त्याचबरोबर राजकीय नेत्यांनी गायकवाड कुटूंबीयांना आधार देण्यासाठी संवेदना व्यक्त केल्या आहेत.