पुणे प्रादेशिक संचालक श्री. भुजंग खंदारे यांचे प्रतिपादन
पुणे, दि. २० फेब्रुवारी २०२५:छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनाचे वैशिष्ट्य म्हणजे अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असताना त्यांनी प्रत्येक वेळी ती स्थिती अनुकूल केली आणि एकाच वेळी विविध संकटांवर मात करीत रयतेसाठी स्वराज्य निर्माण केले. शिवरायांचा हा आदर्श प्रत्येकाच्या जीवनासाठी मार्गदर्शक आहे असे प्रतिपादन महावितरणचे पुणे प्रादेशिक संचालक श्री. भुजंग खंदारे यांनी बुधवारी (दि. १९) केले.
महावितरण व महापारेषणच्या वतीने रास्तापेठ येथील प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्री. भुजंग खंदारे बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार (महावितरण) व अनिल कोलप (महापारेषण) यांची उपस्थिती होती. यावेळी शिवचरित्रावरील प्रबोधनात्मक पोवाड्याचा कार्यक्रम झाला. वडूज (सातारा) येथील शिवशाहीर श्री. राजेंद्र सानप तडवळेकर व सहकाऱ्यांनी पोवाडे सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
पुणे प्रादेशिक संचालक श्री. खंदारे म्हणाले की, स्वराज्य स्थापनेसाठी जाती, पंथ, धर्मापेक्षा छत्रपती शिवाजी महाराजांनी सहकाऱ्यांच्या गुणवत्तेला सर्वोच्च प्राधान्य दिले. संधी देऊन त्यांच्या क्षमतेचा विकास केला. आत्मविश्वास निर्माण केला. शूरवीर माणसं घडवली. यासोबतच रयतेसाठी निर्माण केलेल्या स्वराज्याला माणूसकीच्या मूल्यांचे अधिष्ठान दिले. लोकाभिमुख व सर्वसामान्यांना न्याय देणाऱ्या प्रशासनाचा आदर्श शिवाजी महाराज यांच्या प्रशासकीय यंत्रणेतून आपल्याला मिळतो. तो आदर्श समोर ठेऊन वीजग्राहकांना सेवा देण्याचे आवाहन श्री. खंदारे यांनी यावेळी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. विनोद रणदिवे यांनी तर सूत्रसंचालन श्री. बाबा शिंदे यांनी केले. श्री. शिवाजी शिवनेचारी यांनी आभार मानले. कार्यक्रमाला महावितरण, महापारेषणमधील अभियंते, अधिकारी, कर्मचारी व सर्व संघटनांचे पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते. आयोजनासाठी सर्व कर्मचारी संघटनांच्या संयुक्त आयोजन समितीने पुढाकार घेतला.