नाशिक-सुमारे 30 वर्षांपूर्वी तुकाराम दिघोळे यांनी राज्यमंत्री असताना राजकीय द्वेषापोटी माझ्यावर ही केस दाखल केली होती. आज या केसचा निकाल आला. निकाल पत्र मी अद्याप वाचले नाही. या निकालाविरोधात उच्च न्यायालयात अपील करणार असल्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे म्हणाले आहेत . न्यायालयाने शिक्षा सुनावल्यानंतर मी रीतसर जामीन घेतलेला आहे, असा दावाही माणिकराव कोकाटे यांनी केला.कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना नाशिक जिल्हा न्यायालयाने 2 वर्षांचा कारावास आणि 50 हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली. 1995 च्या प्रकरणात ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. यासंदर्भात माणिकराव कोकाटे यांनी हि प्रतिक्रिया दिली आहे.
माणिकराव कोकाटे यांच्यावर 1995 मध्ये सदनिकांच्या घोटाळ्यांसंदर्भात कागदपत्रांची फेरफार आणि फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला होता. याप्रकरणी त्यांच्यावर भादंवि कलम 420 (फसवणूक), 465 (कृत्रिम दस्तऐवज तयार करणे), 471 (बनावट दस्तऐवजाचा उपयोग करणे) आणि 474 (सत्यता लपवणे) या कलमांखाली गुन्हा दाखल झाल्यानंतर जिल्हा न्यायालयात खटला सुरू होता. याप्रकरणी न्यायालयाने आज निकाल दिला असून माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू सुनिल कोकाटे यांना 2 वर्षांचा कारावास आणि 50 हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली.
कोकाटे म्हणाले.,’ही राजकीय केस होती. गेल्या 30 वर्षांपूर्वी ही केस दाखल झालेली आहे. त्यावेळी दिघोळे हे राज्यमंत्री होते. माझे आणि त्यांचे राजकीय वैर होते. या वैरात्वापोटी त्यांनी सरकारला सांगून माझ्यावर ही केस केली होती. त्या केसचा निकाल आज 30 वर्षांनंतर पहिल्यांदा लागला आहे. निकाल पत्र हे 40 पानांचे असून मी अद्याप वाचले नाही. ते वाचल्यानंतर त्याबाबत माहिती देईल. निकालाविरोधात अपील करण्याचा निर्णय मी घेतलेला असून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणार असल्याचे माणिकराव कोकाटे म्हणाले.मी राजकारणात जेव्हा प्रवेश केला होता, तेव्हाचे हे प्रकरण आहे. मी त्यावेळी आमदार सुद्धा होतो की नाही, मला माहीत नाही. तो काळ आणि आजच्या काळात फरक आहे. नंतरच्या काळात दिघोळे आणि माझ्यात सलोख्याचे संबंध पण निर्माण झाले. परंतु, एखादी केस नोंदवल्यानंतर नियमान्वये प्रक्रिया होत असते. उशिरा प्रक्रिया झाल्यामुळे आज निकाल लागलेला आहे, असे ते म्हणाले. न्यायालयाने शिक्षा सुनावल्यानंतर मी रीतसर जामीन घेतलेला आहे, असा दावाही माणिकराव कोकाटे यांनी केला.हे प्रकरण समोर आल्यानंतर माझ्या राजीनाम्याची मागणी होऊ शकते. राजकीयदृष्ट्या देशामध्ये अशाप्रकारचे अनेक निकाल झालेले आहेत. एक नागरिक म्हणून मला न्याय मागण्याचा अधिकार आहे. त्यामुळे मी उच्च न्यायालयात न्याय मागणार असल्याचे माणिकराव कोकाटे यांनी सांगितले.

