नाशिक-राज्याचे कृषिमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव कोकाटे व त्यांचे बंधू सुनील कोकाटे यांना नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने 1995 च्या एका प्रकरणात 2 वर्षांची कैद व 50 हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली आहे. या प्रकरणी कोकाटे बंधूंवर एक नव्हे तर चार सदनिका लाटल्याचा आरोप आहे. एका अधिकाऱ्याने दाखल केलेल्या तक्रारीमुळे त्यांना हा दिवस पहावा लागला.
माणिकराव कोकाटे यांनी नाशिक शहराच्या मध्यभागी असणाऱ्या बॉईज टाऊन शाळेलगतच्या एका इमारतीमधील सदनिका बनावट दस्तऐवजांच्या आधारावर मिळवल्या. त्यानंतर इतर दोघांच्या सदनिकाही लाटत तिथे अवैध बांधकाम व अतिक्रमण केले.यासंबंधीच्या माहितीनुसार, माणिकराव कोकाटे व त्यांचे बंधू सुनील कोकाटे यांनी 1995-97 दरम्यान शासनाकडून मिळणाऱ्या सदनिका घेतल्या होत्या. यासाठी त्यांनी आमचे उत्पन्न कमी असून, आम्हाला दुसरे कोणते घरही नाही अशी बतावणी केली होती. त्यानंतर त्यांना या सदनिका मिळाल्या. विशेष म्हणजे कोकाटे बंधूंनी केवळ त्यांना मिळालेल्या सदनिकाच घेतल्या नाही, तर इतर दोघांना मिळालेली घरेही गरीब म्हणून लाटली.ही बाब अप्पर जिल्हाधिकारी विश्वनाथ भास्कर पाटील यांच्या लक्षात आली. त्यांनी यासंबंधी तक्रार दाखल केली. माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांनीही यासंबंधी एका याचिकेद्वारे कोकाटे यांच्यावर कागदपत्रांत फेरफार व फसवणुकीचा आरोप केला होता.या प्रकरणी नाशिकच्या सरकार वाडा पोलिस ठाण्यात भादंवि कलम 420, 465, 471,47 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. न्यायालयात हे प्रकरण 1997 पासून सुरू होते. त्याचा आज निर्णय आला. प्रस्तुत प्रकरणात एकूण 4 आरोपी होते. त्यात माणिकराव कोकाटे व त्यांचे बंधू सुनील कोकाटे यांच्यासह इतर दोघांचा समावेश होता. पण कोर्टाने इतर दोन आरोपींना कोणत्याही स्वरुपाची शिक्षा ठोठावली नाही.पण कोकाटे बंधूंना 2 वर्षांची शिक्षा व 50 हजार रुपयांच्या आर्थिक दंडाची शिक्षा ठोठावली. या प्रकरणात एकूण 6 साक्षीदारांची साक्ष तपासण्यात आली. जवळपास 29 वर्षांनी या खटल्याचा निकाल लागला आहे.
माणिकराव कोकाटे यांचा राजकीय प्रवास-माणिकराव कोकाटे हे राज्याचे कृषिमंत्री आहेत. त्यांचा जन्म नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील सोमाठाणे येथे झाला. त्यांच्या राजकारणाची सुरुवात NSUI या विद्यार्थी संघटनेपासून झाली. त्यानंतर त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला. जिल्हा परिषद सभापती, सिन्नर पंचायत समिती सभापती, आमदार आणि मंत्री असा त्यांचा राजकीय प्रवास आहे. त्यांनी गतवर्षी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातीतल महायुती सरकारमध्ये कृषिमंत्री म्हणून पदभार हाती घेतला.माणिकराव कोकाटे यांनी 1999 मध्ये सिन्नर विधानसभेची जागा पहिल्यांदा लढवली आणि विजय मिळवला. त्यानंतर 2004 , 2009 मध्ये ते आमदार म्हणून पुन्हा निवडून आले. 2014 मध्ये त्यांचा पराभव झाला. 2019 आणि 2024 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा विजय झाला. 2024 मध्ये त्यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवत विजय मिळवला. त्यानंतर त्यांच्याकडे महाराष्ट्र राज्याच्या कृषिमंत्रिपदाचा कार्यभार सोपवण्यात आला.