मुंबई-राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू सुनील कोकाटे यांना 2 वर्षांचा कारावास आणि 50 हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. 1995 मधील एका प्रकरणात त्यांना ही शिक्षा सुनावण्यात आली. कागदपत्रांची फेरफार आणि फसवणूक केल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला आहे.दरम्यान, कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना कोर्टाकडून जामीन मिळाला आहे. 15 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर हा जामीन देण्यात आला. माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजुर झाला असला, तरी त्यांना पुढील 30 दिवसांत सत्र न्यायालयात अपील करावे लागणार आहे.
1995 मध्ये कागदपत्रांची फेरफार आणि फसवणुकीच्या आरोपांवरून हा निर्णय देण्यात आला आहे. माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांनी 1995 मध्ये माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात सदनिकांच्या घोटाळ्यांसंदर्भात याचिका दाखल केली होती. आमच्याकडे घर नाही आणि आमचे उत्पन्न कमी असल्याचे सांगून माणिकराव कोकाटे आणि भाऊ सुनील कोकाटे यांनी मुख्यमंत्री निधीतील सदनिका घेतल्याचा आरोप करण्यात आला होता. याप्रकरणी माणिकराव कोकाटे आणि त्यांच्या भावावर भादंवि कलम 420 (फसवणूक), 465 (कृत्रिम दस्तऐवज तयार करणे), 471 (बनावट दस्तऐवजाचा उपयोग करणे) आणि 474 (सत्यता लपवणे) या कलमांखाली गुन्हा दाखल झाला होता.30 वर्षांनंतर या खटल्याचा आज नाशिक जिल्हा न्यायालयाने निकाल दिला. त्यानुसार माणिकराव कोकाटे आणि त्यांचे भाऊ सुनिल कोकाटे यांना 2 वर्षांचा कारावास आणि 50 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. या सुनावणीला माणिकराव कोकाटे स्वतः जिल्हा न्यायालयात हजर होते. जिल्हा न्यायालयाने शिक्षा ठोठावताच माणिकराव कोकाटे यांच्याकडून तत्काळ जामीन मिळण्यासंदर्भात हालचारी सुरू झाल्यात आहेत. त्यांनी जामिनासाठी अर्ज केला आहे.
या प्रकरणामुळे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे अडचणीत आले आहेत. त्यांच्या आमदारकी आणि मंत्रीवर टांगती तलवार आहे. कारण लोकप्रतिनिधीला दोन किंवा त्यापेक्षा जास्त वर्षांची शिक्षा झाल्यास त्याचे सभागृहाचे सदस्यत्त्व रद्द होते. तसे झाल्यास माणिकराव कोकाटे यांच्या राजकीय कारकीर्दीला ब्रेक लागू शकतो.
आता माणिकराव कोकाटे यांच्या रुपाने अजित पवार गटाचा दुसरा मंत्री अडचणीत आला आहे. धनंजय मुंडे यांच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुसऱ्या नेत्याचे मंत्रिपद संकटात सापडले आहे. त्यामुळे आता माणिकराव कोकाटे, अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस काय पावले उचलणार, हे बघावे लागेल. तसेच यावरून भाजप आणि शिंदे गटाची भूमिका काय राहील? याकडे लक्ष लागले आहे.